मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून सहाही आरोपीं दोषमुक्त

0
251

गोवा खबर : मडगाव येथे अकरा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा दिला असून त्यात सर्व सहाही आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे म्हापसा विशेष न्यायालयाच्या निवाड्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 16 ऑक्टोबर 2009 रोजी मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची खंडपीठात सुरू असलेली सुनावणी 15 सप्टेंबर रोजी संपली होती. आज (19 रोजी) खंडपीठाने त्यावर निवाडा दिला.

याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) म्हापसा येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले हाते. न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. मात्र या आदेशाला एनआयएने खंडपीठात आव्हान दिले होते.

सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि तो घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. संस्थेचे दोन कार्यकर्ते बॉम्बस्फोटात ठार झाले होते. याप्रकरणी संस्थेच्या एकूण 11 कार्यकर्त्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

आरोपींवर बॉम्बस्फोटाचा खटला लादण्यामागे एनआयएचा सनातन संस्थेला बदनाम करण्याचा हेतू असल्याचा दावा म्हापसा विशेष न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी केला होता आणि न्यायालयाने तो उचलून धरला होता. मात्र खंडपीठाने एनआयएला क्लीन चीट देत या प्रकरणात काही मुद्दे सिद्धही झाले असून आरोपींना संशयाचा फायदा मिळाल्याचे आदेशात म्हटले आहे. साहाय्यक सॉलिसिटर अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई यांनी एनआयएच्या बाजूने युक्तिवाद केला.