गोवा खबर:दक्षिण गोव्यातील मडगावातील ‘एसजीपीडीए’च्या किरकोळ मासळी बाजाराच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकक्षेत मासळी बाजार उभारण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाच्या साहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनारे यांनी दिली.
काल सकाळी ‘एसजीपीडीए’च्या किरकोळ मासळी बाजाराला डॉ. हसनारे यांनी प्रतिनिधी मंडळासह  भेट दिली. मडगावातील किरकोळ मासळी बाजारात पाण्याचा निचरा, मासळीविक्रेत्यांसाठी बसण्याची सोय, पाण्यासाठी ठिकठिकाणी केलेली नळांची सोय अशा सुविधा पाहून त्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील किरकोळ मासळी बाजारातही अमलात आणण्याचे आम्ही ठरविले आहे, असे हसनारे यांनी सांगितले.
‘एसजीपीडीए’च्या किरकोळ मासळी बाजारात मासळी कापण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन स्वतंत्र शेड्सचीही पाहणी या पथकाने केली. अशी मासे कापण्याची व्यवस्था आम्ही मालवणमध्येही पाहिली होती. मात्र आमच्याकडे मासळी कापल्यानंतर त्यापासून जास्त कचरा तयार होत असल्याने कापण्यासाठी सुविधा राबविलेली नाही, असे डॉ. हसनारे यांनी सांगितले.
व्हॉटस्ऍप व यूटय़ूबसारख्या माध्यमांतून मडगावच्या या मार्केटबद्दलची माहिती आम्हाला प्राप्त झाली. आमच्या महापौरांनी आमचे अभियंते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जोडीला आपल्यावर मडगावातील बाजाराची पाहणी करून माहिती जाणून घेण्याची जबाबदारी टाकल्याने आम्ही या दौऱ्यावर आलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई, एसजीपीडीएच्या अध्यक्षा डॉ. रेणुका डिसिल्वा, सदस्य सचिव अशोक कुमार, अन्य अधिकारी व मडगाव पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. एसजीपीडीएच्या अध्यक्षा डॉ. डिसिल्वा म्हणाल्या, बृहन्मुंबईसारख्या महापालिकेच्या पथकाने गोव्यासारख्या लहान राज्यातील मासळी बाजाराची स्तुती करून अशा प्रकारचे मार्केट आपल्या कार्यक्षेत्रात उभारण्याचा निर्णय घेणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
या पथकाने मडगाव पालिकेला भेट दिली असता नगराध्यक्षा प्रभुदेसाई, मुख्याधिकारी एस. नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी साहाय्यक आयुक्तांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय व अन्य विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना दिली.