मडगावचे माजी उप-नगराध्यक्ष नारायण पै फोंडेकर यांचे निधन

0
144
 गोवा खबर: मडगाव नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष व  समाजसेवक नारायण दामोदर पै फोंडेकर यांचे रविवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने  निधन झाले. आपल्या मित्रांसोबत बेळगावला गेले असताना तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. निधन समयी  त्यांचे वय ७१ वर्षे होते. 
आज, सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्यांचे पार्थीव मडगावच्या कोंब वाड्यावरील निवासस्थानी आणल्यानंतर मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमित त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ बंधू रमेश यांनी चितेस अग्नी दिला.
त्यांच्यामागे बंधू रमेश, अविनाश व कामू तसेच भगिनी कल्याण श्रीधर करमली व प्रतिभा रामप्रसाद लाड असा परिवार आहे.
मडगाव नगरपालीकेचे नगरसेवक म्हणुन ते दोनदा निवडून आले होते. मडगावचे उप-नगराध्यक्ष म्हणुनही त्यांची निवड झाली होती. मठग्रामस्थ हिंदू सभेचे सरचिटणीस म्हणुन ते काम पाहत होते तसेच मडगावच्या स्मशानभुमीची सर्व व्यवस्था व देखरेख तेच करीत होते. मडगाव व इतर परिसरातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व सामान मिळवुन देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत.
मठग्रामस्थ हिंदू सभेच्या जांबावली शिशीरोत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शिगमोत्सवाची वर्गणी गोळा करणे तसेच इतर व्यवस्था तेच सांभाळत असत. गुलालोत्सवाचा प्रसाद म्हणुन साखरभात गोव्यातील विवीध भागातील श्री दामोदर भक्तांना ते स्वत: नेऊन देत असत.
मठग्रामस्थ हिंदू सभेच्या आयतारी नाटक परिवारातर्फे वैकुंठ पै फोंडेकर यांनी श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या जाण्याने आमच्या नाटकाचा सुत्रधार गेला असे म्हटले आहे. गोवा दूरदर्शनवर “झिलबा राणो” या मालीकेच  त्यांनी भूमिका केली होती असे सांगुन, आयतारी नाटकी परिवारांचा आधारस्तंभ गेला असे म्हटले आहे.
नानाच्या निधनाने मडगावचा निस्वार्थी समाजसेवक हरपला: दिगंबर कामत 
 माझे मित्र, मडगावचे माजी उप-नगराध्यक्ष नारायण पै फोंडेकर यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला. त्यांच्या जाण्याने मडगावचा एक निस्वार्थी समाजसेवक हरपला,अशा शब्दात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी फोंडेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कामत आपल्या शोक संदेशात म्हणतात, नाना ह्या नावाने परिचीत असलेले ते एक अजातशत्रु व्यक्तिमत्व होते. गरजेच्यावेळी मदतीचा हात पुढे करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता.
मडगावच्या स्मशानभूमिच्या व्यवस्थापनात त्यांचे महत्वाचे योगदान होते. प्रत्येक दिवशी तेथे जाऊन एकंदर देखरेख ठेवणे ही त्यांची दिनचर्याच होती. अत्यंसंस्कारासाठी लागणारे सामान व इतर व्यवस्था यासाठी ते नेहमीच तत्पर असत.
व्यवसायाने फोटोग्राफर असलेले, नारायण पै फोंडेकर एक कलाकार ही होते. अनेक नाटकांत तसेच गोवा दूरदर्शनच्या एका मालीकेत त्यांनी भूमिका केली होती.
त्यांच्या कुटुबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यांस शांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.