मगोसारखी गत गोवा फॉरवर्डची देखील होऊशकते:चोडणकर

0
943
गोवा खबर:भाजपने देश भरात नेहमी प्रादेशिक पक्षांचा वापर करून स्वतःचा विस्तार केला आहे.गोव्यात मगो बाबत तेच घडले.जनतेचा कौल भाजप विरोधात असताना मगोने साथ दिल्याने सरकार बनले होते.आता त्यांना चांगला धडा मिळाला आहे.मगो बाबत जे घडले ते गोवा फॉरवर्ड बाबत देखील घडू शकते,असे भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज व्यक्त केले.
काँग्रेसच्या सायकल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.12 मतदारसंघात 122 किमी अंतर सायकल यात्रेने पूर्ण केले असून लोकांमध्ये भाजप विरोधात रोष पहायला मिळाला असे सांगून चोडणकर म्हणाले,लोकांचा प्रतिसाद बघता उत्तर आणि दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव होणार हे नक्की आहे.
उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक हे धूमकेतु असून 5 वर्षांनी एकदा दर्शन देतात,अशी टिका करून चोडणकर म्हणाले,ज्याना 4 वेळा खासदार होऊन देखील दिल्लीत कोणी ओळखत नाही.ज्याना पंतप्रधान वर्षभर भेटीसाठी वेळ देत नाहीत त्यांना यावेळी लोक निवडून दिल्लीला पाठवण्याचा प्रश्नच येत नाही.
भाजप राजकारणातून कमावलेल्या पैशातून आमदार खरेदी करून सरकार टिकवण्याची धडपड करत असल्याचा आरोप करून चोडणकर म्हणाले,भाजपचा जनाधार हरवला आहे. त्यांना आपले आमदार निवडून येणे शक्य वाटत नसल्याने ते दुसऱ्यांचे आमदार खरेदी करत आहेत.
भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मगोचा वापर करून घेतला.आता गरज संपल्या नंतर त्यांनी मगोच संपवला. जी गत मगोची झाली तीच गत गोवा फॉरवर्डची होणार आहे. सत्तेवर येण्यापूर्वी जे विधान शिवोली मध्ये विजय सरदेसाई यांनी केले होते त्याचा प्रत्यय आता येत आहे.गोवा फॉरवर्ड सुद्धा त्यापासुन वाचणार नाही,असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी साखळीचे माजी आमदार प्रताप गावस यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.उत्तर गोवा जिल्हा प्रमुख विजय भीके यांनी त्यांचे स्वागत केले.