मगोने सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतरच नेतृत्वाच्या प्रश्नाविषयी भूमिका घ्या:गावडे

0
1883
मगोने ब्लॅकमेलिंगचे राजकरण करु नये:गावडे यांचा सल्ला
गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची सरकार वरील पकड ढीली पडताच त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.मगोला पर्रिकर बरे होई पर्यंत ज्येष्ठ मंत्री अर्थात सुदिन ढवळीकर यांच्याकडे नेतृत्व सोपवलेले हवे आहे.मात्र अपक्ष मंत्री गोविंद गावडे यांनी मगोला जाहीरपणे डिवचत आघाडी मध्ये आलबेल नसल्याचे दाखवून दिले आहे.  गावडे यांनी मगोला सरकारमध्ये राहून धमक्या देणे योग्य नव्हे. मगोपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण करू नये,असा देखील सल्ला दिला आहे.
आघाडी सरकारमधून अगोदर बाहेर पडा व मग नेतृत्वाच्या प्रश्नाविषयी काय ती भूमिका घ्या, सरकारमध्ये राहून बोलू नका, असा स्पष्ट चिमटा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद  गावडे यांनी मगो पक्षाला काढला आहे.
 धमक्या व ब्लॅकमेलिंगचे राजकारण मगोकडून सुरु असून ते  त्यांनी थांबवावे असे  गावडे यांचे म्हणणे आहे.
गावडे यांनी 2017 च्या निवडणुकीत प्रियोळ मतदार संघातून मगोचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांचा पराभव केला होता.गावडे सरकारला पाठिंबा देऊन मंत्री बनले आहेत.त्यांच्या मतदारसंघात मगो हाच विरोधी पक्ष असल्याने आघाडी सरकारमध्ये सहभागी असले तरी गावडे यांना आपला मतदार संघ राखण्यासाठी मगोला काबूत ठेवणे गरजेचे आहे.
पुढील महिन्याभरात जर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे ताबा दिला नाही तर मगोपला एखादा स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर नुकताच सरकारला दिला आहे.त्यावर बोलताना गावडे म्हणाले, सध्या लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत व विधानसभेच्याही दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यावेळी स्वत:ची वाटाघाटींची शक्ती वाढवून घेण्यासाठी कुणी इशारे देऊ नयेत. सरकारमध्ये राहून कसले इशारे देता, सरकारचा पाठींबा अगोदर काढून घ्या आणि मग काय त्या भूमिका घ्या. मगोपकडून धमक्यांचे राजकारण केले जात आहे हे सर्वाना कळते.
 मंत्री गावडे म्हणाले, सरकारमध्ये राहून धमक्या देणो योग्य नव्हे. मगोपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण करू नये.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे काय असे विचारताच मंत्री गावडे यांनी आपल्याला तरी अजून बैठकीचे निमंत्रण आलेले नाही असे सांगितले.