मंत्रीमंडळ फेररचनेवर फ्रान्सिस डिसोझा नाराज

0
1392
20 वर्ष एकनिष्ठ राहिल्याचे फळ मिळाल्याचा व्यक्त केला सुर
 गोवा खबर:भाजपाशी २० वर्षे निष्ठा ठेवली त्याचे हे मला फळ मिळाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त करत भाजप मध्ये मंत्रीमंडळ फेर रचनेनंतर ऑल इज नॉट वेलचे चित्र दिसेल याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सिस डिसोझा यांना फोन करून त्यांच्या कडील मंत्रिपद काढून ते दुसऱ्या आमदाराकडे दिले जाणार असल्याचे कळवले. त्यावर नाराज झालेल्या डिसोझा यांनी आपण या निर्णयाने खुश नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
डिसोझा म्हणाले,मी फक्त एक महीना माझ्या मंत्री पदाच्या कामापासून दूर आहे.पक्ष माझे आजारपण महीनाभर सुद्धा सहन करू शकत नाही याचे वाइट वाटते.मी आज देखील मंत्री म्हणून काम करण्यास सक्षम आहे.पर्रिकर यांनी स्वतः मला अमेरिकेत उपचारासाठी पाठवले असताना असे घडणे अनपेक्षित आहे.
स्थानिक पत्रकारांशी अमेरिकेतुन फोनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना डिसोझा म्हणाले, मला जेव्हा मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणले होते आणि माझी खाती कमी केली होती तेव्हाच मला पुढे कधीतरी असे होणार याची कल्पना आली होती. पक्षातील काही लोकांना मी नकोसा झालो आहे.
 मी भाजपासाठी २० वर्षे निष्ठेने काम केले त्याचे हे फळ आहे अशा शब्दात डिसोझा यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
डिसोझा म्हणाले,नीलेश काब्राल हे सहा महिन्यांपूर्वीच आपण नगर विकास मंत्री होणार असे आपल्या जवळच्या लोकांना सांगत होते तेव्हाच मला कुणकुण लागली होती. आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा फोन करून माझे मंत्रिपद दुसऱ्याला दिले जात आहे असे सांगितले, जे मला अपेक्षित होते.
६४ वर्षीय डिसोझा हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. यापूर्वी ते भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेत. १९९९ मध्ये राजीव काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले डिसोझा हे त्यानंतर २००२, २००७, २०१२ व २०१७ ची निवडणूक भाजपाच्या उमेदवारीवर लढले व जिंकले. २०१२ मध्ये ते पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले.