‘भिऊपाची गरज ना’ या भूमिकेमधून बाहेर या : राहुल म्हांबरे

0
235
गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना वेतनवाढ व विमा देण्याच्या घोषणेवर एक वर्ष होऊनदेखील अजून अंमलबजावणी केली नाही, अशी खंत आम आदमी पक्षाने आज व्यक्त केली.
आपच्या गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी निदर्शनास आणून दिले की, नेमके एका वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि पगारात २० टक्के वाढ जाहीर केली होती.
“तथापि, अद्याप एक वर्ष उलटूनही दोघांपैकी कोणाचीही पूर्तता झाली नाही,” असे सांगत राहुल म्हणाले की त्यांना अजूनही जुन्या वेतना इतकाच मोबदला दिला जातो आणि कोणालाही विमा संरक्षण देण्यात आले नाही.
दिल्लीतील आप सरकार कोविडला सामोरे जाण्यासाठी एक चांगले मॉडेल घेऊन आले, ज्याचे स्वागत इतर काही राज्यांनी केले आहे.
“पण दुर्दैवाची गोष्ट आहे की, आम्ही कठोर परिश्रमपूर्वक तयार केलेली कागदोपत्री श्वेतपत्रिका सादर करून सुद्धा गोव्याने दिल्ली मॉडल कडून काहीच शिकवण घेतली नाही,” असं राहुल म्हणाले.
ते म्हणाले की, गोव्याला आता दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागणार आहे आणि दुसऱ्या लाटेला वेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची गरज आहे, हे लक्षात न घेता सरकार पूर्वी हाताळल्या गेलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब करीत असल्याने, त्यास सामोरे जाण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे.
ते म्हणाले की, गोवा सरकार श्वेतपत्रिकेतील शिफारशी लागू करण्याचे काम करेल आणि किमान पाच कलमी धोरण अवलंबेल, अशी आशा आहे. यामध्ये घरगुती अलगीकरण, मृत्यूची संख्या कमी करणे, रुग्णवाहिका व्यवस्थापन आणि सर्व भागधारकांचा समावेश आहे.
“डॉ प्रमोद यांनी दुसरी लाट गांभीर्याने घेण्याची आणि गोव्यातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे,” राहुल म्हणाले.
दिल्लीत उत्कृष्ट निकाल देणारा टेस्टिंग, ट्रेसींग, ट्रीटमेंट, ट्रॅकिंग आणि टीम इत्यादींचा समावेश असलेला 5T फॉर्म्युला गोव्यामध्येही अवलंबला जाणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
राहुल यांनी गोव्यात रुग्ण वाढत असल्याकारणाने गोव्यातील चाचणी सुविधा वाढविण्याचे आव्हान केले. घरातील अलगीकरणासाठी योग्य मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आणि गोव्यात कोविडच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने गोव्यात अलगीकरणासाठी अधिक सुविधा देण्याची मागणी केली.
“गोव्याचा २० टक्के कोविड पॉझिटिव्ह दर देशात सर्वाधिक आहे आणि मडगाव व कळंगुट हे नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत,” असं राहुल म्हणाले.