भारावलेल्या वातावरणात ‘अटल सेतू’चे गोव्यामध्ये लोकार्पण

0
775

 

गोवा खबर:गोव्यातील मांडवी नदीवर उभारण्यात आलेल्या तिसऱ्या पूलाचे आज अत्यंत भारावलेल्या वातावरणात लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नैकानयन, जलस्रोत, नदी विकास व गंगा पुनरुथ्थान मंत्री नितीन गडकरी तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या पूलाचे एकत्रित उदघाटन करण्यात आले. तसेच या पूलाचे नामकरण ‘अटल सेतू’ असे करण्यात आले आहे. या सोहळ्याला गोव्यातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावली होती.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणाला यावेळी सुरुवात केली. पूलाचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारने या पूलाच्या निर्मितीसाठी ५० टक्के वाटा उचलल्याचे त्यांनी सांगितले. अनेक अडचणी येत असतानाही पूल उभा राहणे, हा पर्रीकरांच्या जबरदस्त इच्छाशक्तीचा परिचय असल्याचे आणि त्यांच्या हस्ते पूलाचे उदघाटन झाल्याचा आनंद असल्याचे गडकरी म्हणाले. ‘स्टेट ऑफ आर्ट’चा उत्कृष्ट नमुना गोव्यातील जनतेला प्रदान करत आहे, असेही ते म्हणाले. देशभरात आतापर्यंत सुमारे १० लाख कोटी पेक्षा अधिक रकमेची कामे करण्यात येत आहेत, त्यातील १५ हजार कोटी गोव्यासाठी देण्यात आले, हे गोव्याच्या जनतेचे श्रेय आहे, असे ते म्हणाले. पूर्वी गोव्याला वर्षाला फक्त ६० कोटी रुपये मिळायचे, त्यातुलनेत आता गोव्यामध्ये विकास कामांना वेग आला आहे. आता गोव्यातील जनतेने व्हेनिस शहराप्रमाणे जलवाहतुकीचा प्राधान्याने विचार करावा, अशी मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे गोव्याच्या सौंदर्यामध्ये भर पडून जगभरात त्याचे नाव मोठे होईल, असेही पुढे ते म्हणाले. गोव्याच्या विकासात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा असून केंद्रीय मंत्री असतानाही नेहमी गोव्याचा विचार ते करत असत, अशी आठवण सांगताना आता गोव्यातील खाण प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे गडकरी म्हणाले. गोव्यामध्ये पर्रीकरांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाबद्दल त्यांनी कौतुक केले. भाषणाच्या शेवटी गोव्यासाठी मंजूर केलेली रुपये १५ हजार कोटींची सर्व कामे निश्चित पूर्ण करून देईन, असे वचन गडकरी यांनी उपस्थितांना दिले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वस्थ असतानाही उपस्थित होते व त्यांनी उपस्थितांना संबोधित करण्याची इच्छा दाखवली असता उपस्थितांमध्ये चैतन्य दिसून आले. ‘हाऊ इज द जोश?’ अशी सुरुवात पर्रीकरांनी करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे जोशात ‘हाय सर’, असा प्रतिसाद दिला. तुमच्यातील हि ऊर्जा  माझ्यात घेऊन तुमच्याशी बोलतो असे म्हणत, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकेच्या यशाचे श्रेय तिथल्या उत्कृष्ट रस्त्यांना दिले होते, ते लहानपणापासून मनात होते आणि त्यामुळेच माझा प्राधान्यक्रम रस्ते विकासालाही आहे, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील जनतेच्या पैशातूनच उभा राहिलेला पूल जनतेचाच आहे, यातून इंधन आणि पर्यायाने पैशांची बचत होणार आहे, हे देखील त्यांनी लक्षात आणून दिले. पाच वर्षाच्या आत पूर्ण झालेला गोव्यातील हा पहिलाच मोठा प्रकल्प आहे, अशी माहिती पर्रीकरांनी यावेळी दिली. त्यानंतर गोव्यातील विकास कामांना अविचाराने विरोध न करता नागरिकांनी सकारात्मक राहण्याचे भावनिक आवाहन पर्रीकर यांनी याप्रसंगी केले.

यानंतर हा पूल बांधण्याचे पर्रीकरांचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारमधील एकवाक्यतेमुळे शक्य झाल्याचे यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी नमूद केले.

 

अटल सेतू भारतातील तिसरा सर्वात लांब पूल असून केबल स्टे प्रकारातील आहे. या पूलाच्या उभारणीला सुमारे चाडे चार वर्षांचा कालावधी लागला. संपूर्णपणे भारतीय बनावटीने तयार झालेला हा पूल ‘मेक इन इंडिया’च्या योजनेचे प्रतिनिधित्व करणारा आहे. भारतातील नामवंत कंपनी एल अँड टी यांनी या पूलाची रचना व बांधकाम केले आहे.  हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबल धारीत आहे. सदर पूल पणजी शहरातील वाहतुकीचा भार कमी करेल.