भारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत…

0
2017
भारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत , आणि त्यातील काही लोकं जातीच्या नावावर किती माती खातात हे दाखवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे
कौमार्य चाचणी ? लग्न झाल्यावर जोडप्याने एका ठराविक वेळेत रूम वर जाऊन सेक्स करायचं , जाताना पांढरा कपडा घेऊन जायचा , नवऱ्याने सेक्स करताना तो पांढरा कपडा मुलीच्या अंगाखाली ठेवायचा आणि सेक्स करताना जर त्या पांढऱ्या कपड्यावर तिचे रक्त आले तर आणि तरंच ती ‘ खरा माल’ नाहीतर ‘ खोटा माल ‘ ….खरा माल निघाला तर ती मुलगी पवित्र , खोटा माल निघाला तर तिचं आयुष्य जातपंचायत ठरवणार ? कोणी दिले हे हक्क ? कोणती ही जात आणि ती मानणारे माणसं ?  खरंच लाज नाही वाटत या लोकांना ?   जर हे असं काही घडत असेल तर ..अतिशय वाईट आणि निंदनीय आहे हे नक्कीच … जात जी जात नाही… स्वदेश चित्रपटात मोहन म्हण्जेकंब शाहरुख खान च्या तोंडी असलेलं वाक्य त्यावेळीही मनाला भिडलेलं आणि लागलेलं ..आणि लाज आणणारं.  अशी उदाहरणे पाहिल्यावर का भारत सर्वोकृष्ट देश आहे हे मी मानायचं ?
एकावेळीस मी हे म्हणणं समजून घेईन की जातीचा अभिमान करावा कारण तिलाही भारतीय संस्कृतीत एक इतिहास आहे . तो जपण्याच्या दृष्टीने चांगले काही करणे ठीक , पण फुकटचा माज कशासाठी ? कौमार्य चाचणी सारखे असंख्य मुद्दे आहेत . मुळात स्त्रियांना महत्व न देणारे करोडोंनि आहेत . शहरात आर्थिक प्रगतीमुळे कदाचित इकडच्या स्त्रिया थोडं चांगलं आयुष्य जगत असतील , पण मी म्हणेन काही प्रमाणातच,  कारण बंद रूम मध्ये नवरा बायको मध्ये कशाप्रकरचे नाते आहे यावरच तिला कशी वागणूक मिळत असेल हे कोणीही खरंच सांगू शकणार नाही , कारण लोकांना दाखवण्यासाठी असलेला बुरखा अनेकदा बरंच काही वेगळंच सांगतो , असो.  गावातील स्त्रियांच्या  मानअपमानाबद्दल मी बोलणे उचित नाही होणार , कारण साक्षर लोक विचार करून कसे वागतात हे सर्वांना माहीत आहे तिथे जी माणसे साक्षर नसतील , ज्यांची विचार करण्याची पद्धत विचित्र असेल अशी लोक स्त्रियांना कशी वागवत असतील या बद्दल मला खरच बोलायचं नाही . पुरुषप्रधान  संस्कृती जिथे स्त्री ही स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागवली जाते त्या देशाचा नागरिक असणं कधीकधी खरंच बोचत. आणि जातिचा विळखा केवळ स्त्री पुरती मर्यादित नाही आहे , आरक्षण हा तर कीव आणणारा मुद्दा  आहे  …एखाद्याची शिकण्याची ऐपत नसेल तर त्याला आरक्षण मिळणे महत्वाचे , पण आपल्याकडे सर्रास ,  जेव्हा सबळ लोक , आरक्षणाचा बुरखा घालतात … मग ते कोणत्याही जातीचे असोत .. आणि जातीच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजतात तेव्हा लाज हा प्रकार कदाचित त्यांना माहीत नसावा असेच वाटते .  माझ्या दृष्टीने हातपाय धडधाकट असून सुद्धा नागडे होऊन भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी यांची गिणती करतो .. मग लोकांच्या मते ती कितीही वरची किंवा खालची जात असो .. लोकांच्या मते म्हटलंय कारण माझ्या दृष्टीने जात महत्वाची नाहीच व्यक्ती महत्वाची ..असो पण आज एबीपी माझा वरील कौमार्य चाचणी चा विडिओ पाहिल्यावर तर मनुष्य  हा जातीच्या विळख्यात अडकून त्याहुन हीन पातळी वर जातोय हेच दिसतंय.
प्रत्येकाच्या आयुष्यात मुलगी , स्त्री  जगातल्या प्रत्येक पुरुषाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपूर्ण करते. ती नसेल तर तो नसेल . पण हे जातिच्या विळख्यात अडकलेल्या त्या सर्वाना कधी उमगणार देव जाणे . कौमार्य चाचणी म्हणजे तर मर्यादा ओलांडली जात आहे .. ज्यांना कौमार्य चाचणी म्हणजे कळत नसेल त्यांच्या साठी मुलगी लग्नाआधी vergin आहे की नाही हे चेक केलं जातं ? आज २०१८ मध्ये येऊन सुद्धा अशा भिकारड्या परंपरा लोक त्यांच्या जातीच्या दडपणाखाली येऊन करत असतील तर ह्याहून वाईट ते काय ?
माझ्या दृष्टीने जात जायला हवी, जात मानणारे आहेत म्हणून या वाईट प्रथा रूढी मानणारे आहेत.    जर जात नाही मानली तर खरंच कोणाचं काही नुकसान होणार आहे का ? तुम्ही तुमचं कमवता तुमचं खाता त्यात जात येते कुठे ? जातीच्या नावाखाली मिळणारी सवलत मिळण्यासाठी सबळ व्यक्तींनी समाजासमोर नागडे होऊन भीक मागणे बंद केले पाहिले .. जातीच्या नावाखाली लग्न झाल्यावर आपली होणारी बायको ही कुमारी आहे की नाही आणि तिला त्यामुळे नाकारता येण्याचा हक्क असलेली परंपरा उधळून लावली पाहिजे … म्हणजे खरंच आपल्या देशातील विवाह संस्थेचा अभिमान वाटावा की अश्या परंपरा आजही पाळल्या जातात तेव्हा त्या विवाह संस्थेवर बहिष्कार टाकावा ? जातीचा होणारा दुरुपयोग घटना झाल्यानंतर आज पर्यंत आणि आता जातीच्या नावावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या सबळ असलेल्या लोकांना आजपर्यंत कळला नाही की त्यांना आरक्षण नक्की कोणासाठी असावं हे पाहायचं नाही असंच दिसत .. नुकताच पद्मावती या सिनेमाच्या निम्मित झालेला तमाशा तर सगळ्यांनीच पहिला ..
मला खरंच प्रश्न आहे ? हे जात मानणारे नक्की कोण असतात ? ज्यांना आपण करत असलेली पाप दिसतंच नाहीत ? ( देवाला मानत असतील तरी देव खरच त्यांना माफ करू शकेल का ? की आयुष्य संपल्यावर नरकात आधीच सोय केली गेली असेल ? 😂 ) पण राव जबरदस्त , करा अजून कौमार्य चाचण्या , करा आरक्षणासाठी मोर्चे आणि झगडा आरक्षण वर्षोनुवर्षे टिकवण्यासाठी प्रयन्त … कारण तुमच्या साठी आयुष्य तेवढेच आहे !!
– हर्षित म्हात्रे