भारत-बांग्लादेशदरम्यान लवकरच सागरी संशोधनाविषयी सामंजस्य करार

0
1116

गोवाखबर:भारत आणि बांग्लादेशदरम्यान लवकरच सागरी संशोधनाविषयी परस्पर सामंजस्य करार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. या कराराच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेश सागरी संशोधन संस्थेचे शिष्टमंडळ डॉ अशोक कुमार बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली सध्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या भेटीवर आहे. हे शिष्टमंडळ 27 मे 2 जून या काळात राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेची माहिती घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच शेजारील देश आणि लहान द्वीपकल्पांना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत बांग्लादेशला सागरी संशोधन कार्यात मदत करणार आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात दोन्ही देशांना संशोधन करणे सोईचे होईल, असे प्रो. सुनील कुमार सिंग म्हणाले. तसेच विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून जाहीर असलेल्या प्रदेशात आतापर्यंत काहाही संशोधन झाले नाही, ते या करारामुळे सुलभ होईल.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था बांग्लादेशला दीर्घकालीन तसेच अल्पकालीन मुदतीचे विविध अभ्यासक्रम, संशोधन यात मदत करेल. बांग्लादेश सागरी संशोधन संस्थेची स्थापना होऊन केवळ तीन महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रो. सुनील कुमार सिंग म्हणाले.

भारताचे सागरी संशोधनात अतिशय मोलाचे कार्य आहे. त्यामुळे त्यांची मदत ही आमच्यासाठी आनंददायी बाब असल्याचे बांग्लादेश सागरी संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ अशोक कुमार बिश्वास म्हणाले. बांग्लादेशचे शिष्टमंडळ 2 जून रोजी चेन्नईला रवाना होणार आहे.