भारतीय वायु सेनेचा २५ मार्च रोजी भरती मेळावा

0
1020

 गोवा खबर:गोव्यातील तरुणांना भारतीय वायु सेनेत भरती होण्याची सुवर्ण संधी देणारा भरती मेळावा २५ मार्च २०१९ रोजी बांबोळी येथील मैदानावर सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर फर्नांडो डाकॉस्ता यांनी आज पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पणजी येथील माहिती व प्रसिध्दी खात्याच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत विंग कमांडर डाकॉस्ता यांनी सांगितले की, गोव्याच्या तरुणांना भारतीय वायु सेनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे व मार्गदर्शन व्हावे म्हणून या विशेष भरती मेळाव्याचे आय़ोजन करण्यात आले आहे. हा भरती मेळावा गोव्यातील तरुणांना उत्कृष्ट दर्जाचे करियर निवडण्याबरोबरच राष्ट्राची सेवा करण्याची मोठी संधी मिळवून देईल असे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी माहिती व प्रसिध्दी खात्याचे संचालक श्री. नारायण नावती, माहिती अधिकारी श्री. जॉन आगियार उपस्थित होते.

२५ मार्च रोजी बांबोळी येथील मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात इयत्ता बारावी उत्तीर्ण केलेल्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. १९९९ ते २००३ या कालावधीत जन्म झालेल्या व इयत्ता बारावी परीक्षेत कमीत कमी ५० टक्के व इंग्रजी विषयात कमीत कमी ५० टक्के गुण संपादन केलेल्या तरुणांना सदर मेळाव्यात सहभागी होता येईल. यामध्ये विज्ञान शाखा तसेच अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना देखील प्रवेश दिला जाईल.

भारतीय वायु दलात गोमंतकीय जवानांची संख्या इतर राज्यांतील जवनांच्या तुलनेत खूप कमी आहे. गोव्यात अनुभवास येणारी सुशेगाद जीवनशैली किंवा अन्य व्यवसायाप्रती असलेले आकर्षण, तसेच संरक्षण दलात नोकरी पत्करल्यास जिवितास अपाय होण्याची भिती इत्यादीमुळे वायु  दलात भरती होण्यासाठी इथल्या तरुणांचे स्वारस्य फारसे दिसून येत नाही. इथल्या तरुणांमध्ये वायु सेनेतील नोकरी बाबत असलेले गैरसमज मिटावेत व गोमंतकीयांचा भारतीय वायु सेनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे विंग कमांडर डाकोस्ता यांनी यावेळी सांगितले. आपण स्वत: गोमंतकीय असून गेली वीस वर्षांहून अधिक काळ भारतीय वायुसेनेत कार्यरत आहे, या सेवेने आपले जीवन समृध्द बनविले असल्याचे डाकॉस्ता यांनी पुढे सांगितले.

भारतीय वायु सेनेतील नोकरी जवानाला आदर्श जीवन जगण्याची संधी प्रदान करते. देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त होण्याबरोबरच उत्तम वेतन, जवानाला व त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा, आरोग्य सेवा, जवानाच्या व्यक्तीत्वाचा विकास इत्यादी सेवा उपलब्ध असते.

सदर मेळाव्यात तांत्रिक (टॅकनिकल) तसेच अतांत्रिक (नॉनटॅक्निकल) विभागात भरतीसाठी निवड केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेत मुलांची धावण्याची परीक्षा, मानसिक व शारिरीक स्वास्थ्य परीक्षा घेतली जाईल. ६.६ मिनिटांत १.६ कि.मीटर धावणे, सीट अप्स व पुश अप्स (दंड बैठका), इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञानावर, लॅजिकल रिजनिंग या विषयावर लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

भारतीय वायु सेनेने आयोजित केलेला हा भरती मेळावा गोव्यातील तरुणांना देशाची सेवा करण्याबरोबरच उत्तम दर्ज्याचे करिअर घडविण्याची संधी प्राप्त करून देणार असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. नारायण नावती यांनी यावेळी केले.