भारतीय लष्कराच्या भेदक क्षमतेत वाढ ; संरक्षण मंत्र्यांकडून अत्याधुनिक तोफा देशाला अर्पण

0
1038

 गोवा खबर:भारतीय लष्कराची क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या M777 A2 अल्ट्रा लाईट हॉविट्झर,   K-9 वज्र स्वचलित बंदुका आणि 6X6 युद्धभूमीवरील दारुगोळा ट्रॅक्टर्स आज संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांनी राष्ट्र सेवेत समर्पित केल्या. नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली येथे झालेल्या सोहळ्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करी तसेच संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, उत्पादन उद्योगांचे प्रतिनिधी तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

155 मि.मी.च्या 39 क्षमतेच्या अल्ट्रा लाईट (अती हलक्या) हॉविट्झर तोफा अमेरिकेकडून घेण्यात आल्या असून भारतात महिंद्र डिफेन्स आणि बीएई सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून या तोफांची जुळणी करण्यात आली आहे. ही तोफ प्रणाली बहुआयामी,वजनाने हलकी तसेच हेलिकॉप्टरद्वारे नेता येण्यासारखी आहे. यामुळे देशातल्या विविध भौगोलिक विभागात या तोफा सहजतेने तैनात करता येतील. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगातल्या इतर काही देशांच्या लष्करात या तोफा तैनात आहेत. अफगाणिस्तान आणि इराण सारख्या दुर्गम भागात या तोफांची कार्यक्षमता सिद्ध झाले आहे.

155 एमएम/52 कॅलिबरच्या पहिल्या दहा के 9 वज्र तोफा दक्षिण कोरियाच्या हानवा तेचविन कंपनीकडून अर्ध जोडणी असलेल्या स्थितीत आयात करण्यात आल्या असून भारतात लार्सन ॲण्ड टुब्रो तर्फे त्यांची पूर्ण जोडणी करण्यात आली आहे. उर्वरित 90तोफा मुख्यत्वेकरून भारतात निर्मित केल्या जातील. या तोफा तैनात झाल्यानंतर पश्चिम सीमेवरील भारताच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

6X6 फिल्ड आर्टिलरी ट्रॅक्टर्स या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ट्रॅक्टर्सची निर्मिती अशोक लेलॅण्डनं केली आहे. हे ट्रॅक्टर्स जुन्या झालेल्या तोफा वाहून नेणाऱ्या वाहनांची जागा घेतील.

ही संरक्षण सामग्री देशाला अर्पण करण्यामुळे केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे.

यावेळी भारतीय तोफखान्यातील तोफांची मारक क्षमता तसेच लष्कराच्या सेवेत दाखल झालेल्या स्वदेशी बनावटीची अन्य शस्त्रास्त्र दाखवण्यात आली.