भारतीय चित्रपट उद्योगाविषयी अधिक जाणून घेऊन भारतातल्या थोर प्रतिभेसमवेत सहयोगाची सुप्रसिद्ध अभिनेते चीन हान यांनी व्यक्त केली इच्छा

0
1995

गोवा खबर:भारत हे प्रतिभावंतांचे भांडार असून भारताला चित्रपटांची समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतीय चित्रपटांच्या कथानकाविषयी मला औत्सुक्य आहे, अशा भावना चित्रपट अभिनेते चीन हान यांनी व्यक्त केल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतले थोर चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांच्यापासून आपण स्फूर्ती घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

भारतीय चित्रपटांचे आपण प्रशंसक असून अमाप लोकप्रियता मिळवलेला आणि भारतासोबतच भारताबाहेरही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला ‘दंगल’ हा चित्रपट नुकताच पाहिल्याचे ते म्हणाले.

सिंगापूरमधला नाट्य आणि चित्रपट उद्योग ते हॉलीवूड हा आपला प्रवास अनेक रोमांचक घटनाक्रमांनी युक्त आहे असे ते म्हणाले. आपले प्राथमिक शिक्षण रंगभूमीवर झाले, हे असे स्थान आहे जिथे आपल्याला नृत्य, सादरीकरण, आवाजतले चढ-उतार याविषयी बरच काही शिकायला मिळते असे मत या सिंगापूर-अमेरिकन अभिनेत्याने व्यक्त केले.

जग अधिक जवळ येत असून विविध वंशाच्या लोकांचे चित्रपट दाखवण्यासाठी अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध होत आहेत अशा वेळी जागतिक कथानकाचा भाग होण्यासाठी आशियाई अभिनेत्यांना मोठी संधी आहे असे ते म्हणाले. इरफान खानसारख्या अभिनेत्यांनी अमेरिकेत स्थान प्राप्त केले आहे असे सांगून अनेक आशियाई अभिनेते आज जगात लोकप्रिय झाले आहे.

 अभिनेत्यांसाठी हॉलीवूड हे अंतिम स्थान नाही, मात्र ते महत्वाचे स्थान निश्चितच आहे असे ते म्हणाले. भारतातल्या चित्रपट उद्योगाविषयी तसेच दूरचित्रवाणी माध्यमाविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे असे चीन हान यांनी सांगितले.