पणजी

पणजी:भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2017च्या उद्‌घाटनपर सत्रात बियॉड द क्लाऊडस् हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या चित्रपटातले कलावंत इशान खट्टर आणि मालविका मोहनन्, निर्माता पुनित गोएंका (झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) शरीन मंत्री, किशोर अरोरा, रेझा तश्कोरी आणि संजय कुट्टी (सी स्टुडिओ व्यापार प्रमुख) यांच्यासह ख्यातनाम इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पत्रकार परिषद घेण्यात आली.

मानवी मुल्ये, प्रेम, मैत्री आणि कौटुंबिक बंध यावर बियॉड द क्लाऊड हा चित्रपट आधारित आहे. मानवी भाव-भावनांना भाषा आणि भौगोलिक बंध नसतात हा माजिद माजिदी यांच्या दृष्टीकोनाचे दर्शन या चित्रपटात घडते. मुंबई महानगरात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या भाऊ-बहिणी भोवती हे कथानक फिरते.

बियॉड द क्लाऊडस् या चित्रपटासाठी निपुण भारतीय कलाकार आणि इतरांबरोबर काम करणे हा सुंदर अनुभव होता, असे माजिदी म्हणाले. इशान आणि मालविका यांनी भूमिकांना संपूर्ण न्याय देत आपापल्या भूमिका साकारल्या आहेत. बियॉड द क्लाऊडस् हा चित्रपट सार्वत्रिक भावणारा असून, प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातल्या जनतेला हा विषय आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा अनुभव घेता आला, असे माजिदी यांनी सांगितले.

माजिदी, अनिल मेहता, विशाल भारद्वाज आणि ए. आर. रेहमान यासारख्या मान्यवरांबरोबर काम करणे हा उद्‌बोधक अनुभव होता यातून खुप शिकता आले अशी प्रतिक्रिया इशान खट्टर यांनी व्यक्त केली. चित्रपट-निर्माता म्हणून माजिद यांचा दृष्टीकोन साकार करण्याच्या हेतूने सर्वच जण काम करत असल्याचे ते म्हणाले.

बियॉड द क्लाऊडस्‌साठी एकत्रित काम करणे हा महान अनुभव असल्याचे सुजय कुट्टी यांनी सांगितले. जगभरातल्या लोकांना पहायला आवडेल अशी निर्मिती आम्हाला करायची होती. उद्‌घाटनपर कार्यक्रम उत्तम होता, लोकांनी आमच्या चित्रपटाची प्रशंसा केली. असे चित्रपट बनवायला आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

माजिद माजिदी यांच्यासारखा महान चित्रपट-निर्माता रुपेरी पडद्यावर जी कलाकृती सादर करतो, ती अद्वितीय असते. या पडद्यावर चित्तवेधक भूमिका आणि कलाकार म्हणून आणखी आव्हानात्मक भूमिका साकारायला आपल्याला आवडेल, असे मालविका मोहनन् यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होत आहे.