भारतात लघुपट दाखवण्यासाठी एका समर्पित वाहिनीची गरज: बिक्रमजित गुप्ता

0
719

गोवा खबर:भारतात लघुपट निर्मितीला प्रोत्साहन द्यायचे असेल, तर एक समर्पित वाहिनी गरजेची आहे, असे मत ‘ब्रिज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बिक्रमजित गुप्ता यांनी व्यक्त केले. 50 व्या इफ्फी महोत्सवादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. आज-काल लघुपटांसाठी अनेक चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात, तसेच सोशल मिडियामुळे लघुपट लोकप्रियही होत आहेत. मात्र लघुपटांमधून उत्पन्न मिळवण्यासाठी आणखी काही मार्ग शोधले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी त्यांनी त्यांच्या ‘ब्रिज’ या चित्रपटामागची कल्पना आणि निर्मितीचा प्रवासही उपस्थितांना सांगितला. या चित्रपटात टॅक्सी ड्रायव्हर आणि मूक मुलीमधल्या बंधाचे चित्रण आहे. मुंबई हे गतीमान शहर आहे. हे शहर कधीही झोपत नाही. मुंबईच्या रस्त्यांवर रात्री भटकणाऱ्या अनेक लोकांना मी स्वत: भेटलो आहे. अशाच रस्त्यांवर जिथे रात्री शरीर विक्रयाचा व्यवसाय चालतो, तिथे टॅक्सीवाल्याला एक छोटी मुलगी भेटते. अशावेळी हा माणूस त्या लहानग्या मुलीला मदत करेल की नाही, या विचारातून मला या चित्रपटाचे कथानक सुचले असे, गुप्ता यांनी सांगितले. स्वत: कथा, पटकथा लिहिली तर आपण ती लिहितांनाच सिनेमातील दृष्य डोळ्यासमोर आणू शकतो, असे ते म्हणाले. लघुपट निर्मितीसाठी पैशांची जमवाजमव करण्याचा मार्ग कुठला असे विचारले असता, तुम्हाला परिचितांकडूनच पैशांची जुळवाजुळव करावी लागते, त्यासाठी दुसरा मार्ग नाही, असे ते म्हणाले.

‘ब्रिज’

टॅक्सी ड्रायव्हर विनोद आणि एक छोटी मुकी मुलगी यांच्यातल्या या कथानकात अनेक वळणे आहेत. चित्रपटाच्या शेवटी विनोदला एक धक्कादायक सत्य कळते, मात्र या प्रवासात त्या दोघांमध्ये मैत्रीचा एक अनोखा बंध तयार होतो.