भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ- जावडेकर

0
1300

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची एनएमआयसीला भेट

गोवा खबर:भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या पाच वर्षातही जन सहभागाद्वारे अशीच प्रगती साध्य करणे शक्य असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जीवनात आपल्याला लागणारे ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेता आपणा सर्वांनी किमान दहा झाडं लावली आणि जगवली पाहिजेत, पर्यावरण रक्षणाचा हा मार्ग असल्याचे जावडेकर म्हणाले.

कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचा भाग म्हणून मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या गुलशन महल या ऐतिहासिक इमारतीच्या परिसरात तीन रोपांची लागवड केल्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, शाम बेनेगल, किरण शांताराम, वर्षा उसगांवकर यांच्यासह चित्रपट जगतातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या अभियानात सहभागी होण्यासाठी एकत्र आल्याबद्दल जावडेकर यांनी या कलाकारांचे आभार मानले.

पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यावरणमंत्र्यांनी#SelfiewithSaplingहे जन अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने एक रोप लावून त्या रोपाबरोबर आपला सेल्फी समाज माध्यमावर पोस्ट करण्याचे आवाहन या अभियानाद्वारे करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनी, नवी दिल्लीतल्या पर्यावरण मंत्रालयाच्या परिसरात जावडेकर यांनी, पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माजी क्रिकेटपटू कपिल देव, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा, प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या दुसऱ्या कार्यकाळात कॅबीनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जावडेकर यांची मुंबईला दिलेली ही पहिली अधिकृत भेट आहे.

या दरम्यान जावडेकर यांनी फिल्म्स डिव्हिजनमधल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. या वर्षीच्या 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्‌घाटन केले आहे. जावडेकर यांनी चित्रपट क्षेत्रातल्या 100 मान्यवरांशी संवाद साधला. शाम बेनेगल, सुभाष घई, रमेश सिप्पी, केतन मेहता, जब्बार पटेल, किरण शांताराम, शिल्पा शेट्टी, सतीश कौशीक, सिद्धार्थ रॉय कपूर, सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता, पुनम धिलाँ, साजिद नादीयादवाला यावेळी उपस्थित होते,

माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक आर एन मिश्रा, माहिती आणि प्रसारण (चित्रपट) सहसचिव अशोककुमार आर परमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक डी जे नारायण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.