भारताच्या प्रथमेश मौलिंगकरची पोलंडमध्ये अभिमानास्पद कामगिरी

0
1944

 

 

 

गोवा खबर:मिस्टर सुप्रानॅशनल २०१८ ची तिसऱ्या वर्षातील स्पर्धा, ८ डिसेंबर २०१८ रोजी पोलंडमधील क्रिनिका-झेडरोज येथे पार पडली. मिस्टर सुप्रानॅशनल ह्या प्रतिष्ठित  पुरस्काराच्या अंतिम फेरीत जगातील ३९ स्पर्धकांमध्ये चुरस होती.

प्रथमेशला २०१७ ह्या वर्षाचा मिस्टर सुप्रानॅशनल असलेल्या गॅब्रिएल कोरियातर्फे विजेतेपदाचा पट्टा देण्यात आला तर मिस सुप्रानॅशनल २०१८ असलेल्या व्हॅलेरिया वाझक्वेझच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. ह्या स्पर्धेत, मिस्टर सुप्रानॅशनल पोलंड जेकब कुसनर पहिला रनर-अप, दुसरा रनर-अप म्हणून मिस्टर सुप्रानॅशनल ब्राझील सॅम्युअल कोस्टा, तिसरा रनर-अप म्हणून मिस्टर सुप्रानॅशनल थायलंड केविन डसोम तर चौथा रनर-अप म्हणून मिस्टर सुप्रानॅशनल नेदरलँड्स एनीयो फॅफेआनी घोषित करण्यात आलं.

मिस्टर सुप्रानॅशनल २०१८ बनलेला गोवेकर प्रथमेश मौलिंगकर म्हणाला की त्याला विजेतेपद मिळण्याबद्दल नेहेमीच आत्मविश्वास वाटत होता. पण तरीही जेव्हा त्याचं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा त्याचा क्षणभर विश्वासच बसला नाही. ह्या २७ वर्षीय तरुणाने अंतिम फेरीत जगातील ३८ स्पर्धकांवर मात करून ह्या प्रतिष्ठित स्पर्धेतील विजेतेपदाचा मान मिळवला. त्यासाठी प्रथमेशने गेली तीन वर्षं कठोर मेहनत घेतली होती आणि साहजिकच ह्या यशामुळे तो ‘सुपर हॅपी’ आहे आणि लवकरच गोव्याला येऊन ह्या यशाचा आनंद आपल्या कुटुंबीय आणि मित्रांबरोबर साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. गोवेकर असल्याने त्याला ‘सीफूड’ अतिशय प्रिय आहे आणि त्याच्या घरच्या जेवणाची आतुरतेने वाट बघतो आहे.

प्रथमेश म्हणतो, “जेव्हा त्यांनी विजेता म्हणून माझं नाव घोषित केलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि जेव्हा गॅब्रिएल कोरियाने मला ट्रॉफी आणि पट्टा दिला तो क्षण काही औरच होता. मला माहित होतं की मी करू शकेन पण स्पर्धा जिंकणं थोडंसं अनपेक्षित होतं. पण आता माझा विश्वास बसला आहे. कष्टाचं फळ नेहेमी मिळतंच. माझ्यावर विश्वास ठेऊन मिस्टर सुप्रानॅशनल २०१८ मध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी ‘मिस इंडिया ऑर्गनायझेशन’चे आभार मानतो.”  प्रथमेशने ह्या वर्षीच्या मिस्टर सुप्रानॅशनल २०१८ स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेऊन विजेतेपद पटकावलं आहे.

सेंट ऍन स्कुल आणि सेंट झेवियर हायर सेकंडरी कॉलेजचा माजी विद्यार्थी असलेल्या प्रथमेशला आता आपलं यश, कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर घरी साजरं करायचं आहे.

“माझे पालक, शाळा, कॉलेज आणि जिममधले मित्र असे सगळे मी परत येण्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. माझ्या आईबाबांना तर एवढा आनंद झाला होता की त्यांनी केक कापून रात्रभर पार्टी केली. माझे मित्र मला सतत कॉल करून शुभेच्छा देत आहेत. माझे नातेवाईक, शेजारी खूपच एक्साइट झाले आहेत आणि माझ्या शाळा व कॉलेजला माझा सत्कार करायचा आहे. मी ह्या गोष्टीला देवाचा आशीर्वाद समजतो. ही भावना खूपच छान आहे.”

प्रथमेश ह्या यशाचं श्रेय आपल्या शहराला देताना सांगतो, “माझ्या ह्या यशाचं संपूर्ण श्रेय गोव्याचं आहे. माझ्या मूळ व्यक्तिमत्वाला ह्या शहराने आकार दिला आहे. वर्षभरापूर्वी मुंबईला शिफ्ट झाल्यावर, मला संधी देणं आणि जगाला आत्मविश्वासाने सामोरं जायला जरी मुंबईने शिकवलं असलं तरी माझं मूळ गोव्यातच आहे.”

गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर ह्यांनी मि. इंडिया-सुप्रानॅशनल ही स्पर्धा जिंकल्याबद्दल प्रथमेशचं अभिनंदन करताना म्हटलं होतं की त्याने सर्वोत्तम प्रयत्न करून जिंकून परत यावं. त्यामुळे प्रथमेश त्यांना भेटून हा आनंद शेअर करणार आहे.

प्रथमेशला फुटबॉल आणि पोहणं अतिशय आवडतं आणि तो व्यायामाचं वेळापत्रक कटाक्षाने पाळतो. त्याचे कष्ट आणि निष्ठा ह्यामुळे त्याला ‘बेस्ट बॉडी ऍट द मिस्टर सुप्रानॅशनल २०१८’ हा पुरस्कारसुद्धा मिळाला. त्याच्या मते ह्या यशाचं श्रेय त्याचा स्वतःचा व्यायाम, आहार आणि आरोग्याच्या टिप्स ह्या गोष्टींना आहे. त्याला अतिशय निवडक फॅशन आवडते आणि त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे तो एक ‘शुअरफायर विनर’ आहे!

ह्यापुढील प्रवासात, प्रथमेश बॉलिवूड आणि दक्षिण सिने इंडस्ट्री अश्या दोन्ही ठिकाणी संधी मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्याला समुद्र आणि पर्यावरण ह्या गोष्टींबद्दल आकर्षण आहे आणि भविष्यात, प्लास्टिक प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या एखाद्या एनजीओबरोबर त्याला काम करायचं आहे. मिस्टर सुप्रानॅशनल संस्थेबरोबर विविध देशांचा दौरा करून प्रथमेश अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होणार आहे.

गोवा मॅरीयॉट रिसॉर्ट अँड स्पा ह्या ठिकाणी प्रथमेशने आपल्या प्रवासाची कहाणी आणि अनुभव माध्यमांना सांगितले.

 

 

मिस इंडिया संस्थेविषयी:

मिस इंडिया ही देशातील अतिशय लोकप्रिय अशी ग्लॅमरस स्पर्धा आहे, ज्यामध्ये स्वप्नं खरी होतात. जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार ह्या उत्सुकतेने जगातील लाखो लोक है स्पर्धेची उत्सुकतेने वाट बघत असतात. ह्या स्पर्धेतून एक अशी परफेक्ट स्त्री निवडली जाते जी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्समध्ये भारताची प्रतिनिधी म्हणून सामील होईल आणि जिच्यामध्ये सौंदर्य, आत्मविश्वास, अभिजातता आणि बुद्धिमत्ता ह्या गुणांचा मिलाफ असेल. भारताला ह्या मंचाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि ह्यातील माजी विजेत्यांमध्ये ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, लारा दत्ता, प्रियांका चोप्रा, दिया मिर्झा आणि सध्याची मिस वर्ल्ड २०१७ मनुषी छिल्लर ह्यांचा समावेश आहे. ह्या सर्वानी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.