भारताचं चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं

0
851

गोवा खबर:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (ता.२२) ऐतिहासिक कामगिरी करत ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण केले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने अवकाशात झेप घेतली.

चांद्रयान-2 च्या उड्डाणानंतर पंतप्रधानांचा संदेश

आपल्या झळाळत्या इतिहासात कोरुन ठेवण्याजोगे विशेष क्षण! चांद्रयान-2 च्या उड्डाणाद्वारे  आपल्या वैज्ञाानिकांचे कौशल्य आणि प्रतिभेचे दर्शन घडत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आज अभिमानाचा क्षण आहे.

चांद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी अभियान आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर निश्चितच अभिमानाने भरुन आला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ‘लॅन्डर रोव्हर’ आणि ‘ऑरबिटर’ चाही या यानात समावेश आहे.

चांद्रयान-2 ही वैशिष्ट्यपूर्ण मोहिम आहे. या आधीच्या मोहिमांमध्ये अभ्यासल्या न गेलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास चांद्रयान-2 मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. हे अभियान चंद्राविषयी नवी माहिती देईल.

चांद्रयान-2 सारखे प्रयत्न आपल्या युवा पिढीला विज्ञान, सर्वोत्कृष्ट संशोधन आणि शोध यासाठी अधिक प्रोत्साहन देईल. यासाठी ‘चांद्रयान’ मोहिमेला धन्यवाद. भारताच्या चांद्र विषयक कार्यक्रमाला मोठी चालना मिळेल. चंद्राविषयीच्या आपल्या सध्याच्या ज्ञानात लक्षणीय वृद्धी होईल.

-नरेंद्र मोदी (@narendramodi) July 22, 2019

पुर्वनियोजित वेळेनुसारच चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. यापूर्वी १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक कारणामुळे चांद्रयान-२ प्रक्षेपणाची वेळ आज निश्चित करण्यात आली. त्यामुळे झालेल्या उशिराचा यान उतरण्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी इस्रोच्या टीमने घेतली.

चांद्रयान-२ चे भारताचे सर्वांत शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमके-३ द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. प्रेक्षपणानंतर काही वेळातच चांद्रयान-२ पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. हे १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत परिक्रमा करत चंद्राच्या दिशेने प्रवास करेल.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर केले. ‘या यशस्वी मोहिमेबद्दल सिवन यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन केले.

चंद्रावरील पाणी, खडक, खनिज संपत्ती आदी विविध बाबींचा खजिना मानवजातीसाठी ‘चांद्रयान-२’ मोहिमेतून उपलब्ध होणार आहे. या यानास चंद्रावर पोहोचण्यासाठी साधारणत: ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या यानाचे वजन ३,८५० किलोग्रॅम आहे. या मोहिमेसाठी ९७८ कोटी खर्च आला आहे. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यान उतरवून ‘इस्रो’ विक्रम करणार आहे. चंद्रावर यान उतरविल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे. 

 

पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जाणार आहेत. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून वेगळे  होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल आणि ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.