भारताकडे जगाला आकर्षित करण्यासाठी धनापेक्षा धारणा बदलणे अधिक आवश्यक: प्रल्हाद पटेल

0
1625

केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांनी केंद्रीय ‘स्वदेश दर्शन योजने’अंतर्गत गोव्यामधील विविध पर्यटन विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन

 

गोवा खबर:भारतातील वैविध्य आणि सौंदर्य जगाला आकर्षित करणारे आहे; तसेच जागतिक पातळीवर उच्च स्थानावर नेऊन ठेवणारे आहे, गरज आहे ती भारतीय म्हणून आपली मानसिकता बदलण्याची, नवकल्पना सत्यात उतरविण्याची, यासाठी धनापेक्षाही धारणा अधिक आवश्यक आहे, असे उद्गार केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांनी आज पणजी येथे काढले.

‘स्वदेश दर्शन योजना’ किनारपट्टी भाग याअंतर्गत उत्तर गोवा जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध पर्यटन विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पटेल पुढे म्हणाले कि, पर्यटनमंत्री म्हणून काम करताना मी पर्यटकच्या भूमिकेतून समस्या पाहतो व त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. यासाठी दिल्लीत बसून निर्णय न घेता स्थानिक पातळीवर परिस्थिती समजून घेऊन निर्णय होणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. म्हणूनच पर्यटन विकासासाठी निधी केंद्र सरकार देत असले तरी निधी खर्चाचा निर्णय राज्य सरकार घेते.

गोवा राज्याने नैसर्गिक आव्हानांना सामोरे जात स्वदेश दर्शन योजनेतील सर्वात चांगले व वेळेआधी काम केले आहे, याचा आनंद वाटतो; दुसऱ्या टप्प्यातील काम लवकर संपवा, पर्यटन विकासाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नक्की निधी देऊ, असे आश्वासन देखील पटेल यांनी यावेळी दिले. गोवा राज्यातील नागरिकांच्या आतिथ्याचे कौतुक करताना पटेल म्हणाले कि हे आतिथ्यच पर्यटकांना गोव्यामध्ये येण्यास भाग पाडते.

भारताला युनेस्कोमध्ये अधिकाधिक स्थान मिळावे, म्हणून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले; तसेच जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात 36व्या स्थानावर असलेल्या भारताने पहिल्या 10 देशात स्थान मिळवावे, असा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. देशात 17 पर्यटन स्थळांवर आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘स्वदेश दर्शन योजने’अंतर्गत केंद्र सरकारने गोवा राज्यासाठी 199.34 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 99.99 कोटी रुपयांची कामे गोवा राज्यात पूर्ण झाली आहेत; या पर्यटन प्रकल्पांचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामांची पायाभरणी आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी गोवा पर्यटन अॅपचे देखील उद्घाटन करण्यात आले.

स्वदेश दर्शन योजनेतून मिळालेल्या निधीद्वारे उत्तर गोवा जिल्ह्यातील सिक्वेरीम-बागा, अंजुना-वागातोर, मोरजी-केरी, अग्वाडा किल्ला व कारागृह ठिकाणांचा पर्यटनासाठी विकास करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगांसाठीच्या सुविधा, वाहनतळ, कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृहे, प्रकाशझोत, लँडस्केपींग, बाग, पर्यटक माहिती केंद्रे, सीसीटीव्ही, वाय-फाय, भोजनगृहे, अ‍ॅम्फीथिएटर, सुरक्षा नियोजन, जेट्टी यांचा समावेश आहे.