भाजप सरकार डिफेक्टीव्ह असल्याच्या काॅंग्रेस पक्षाच्या दाव्याला मुख्यमंत्र्याची कबुली: अमरनाथ पणजीकर

0
272
गोवा खबर : आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणाचे खापर केवळ सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करुन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील भाजप सरकार डिफेक्टीव्ह, भ्रष्ट व असंवेदनशील असल्याच्या  काॅंग्रेस पक्षाच्या दाव्याला कबुलीच दिली आहे,अशा शब्दात काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
दक्षता जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी राज्यात बोकाळलेल्या  भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द काढू नये हे धक्कादायक आहे. लोकायुक्तांनी भाजप सरकारच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांसहीत इतर मंत्र्यांचा सहभाग असलेल्या  भ्रष्टाचार प्रकरणांची दक्षता खाते तसेच सिबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्याबद्दल बोलण्याचे धाडस मुख्यमंत्र्याना झाले नाही अशी बोचरी टिका पणजीकर यांनी केली आहे.
भाजप सरकारला उतरती कळा लागल्याचे आता सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना कळले आहे. त्यामुळेच सरकारच्या मिशन कमिशनमध्ये सहभागी होऊन भाजपच्या फोर्चुन मेकींग कार्यक्रमात सहभागी होण्यास ज्या अधिकाऱ्यांनी नकार दिला त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यानी केल्याचे पणजीकर म्हणाले.
आपला सर्व खात्यातील प्युन व कारकुनांशी कनेक्शन असल्याचे मुख्यमंत्र्यानी काल उघडपणे कबुल केले आहे. त्यामुळे डिचोली पोलिस खात्याशी संलग्न असलेल्या  व आपल्या राजकीय गाॅडफादरच्या नावे हप्ते गोळा करीत असलेलला ” मालक/ मालिक” कोण याचा खुलासा डाॅ. प्रमोद सावंतानी करावा. कोलवा येथे एक हाॅटेलवर पडलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्यांकडुन ६ लाख जप्त केले होते त्याची वाटणी कशी झाली यावरही मुख्यमंत्र्यानी भाष्य करावे अशी मागणी करुन, डॅा. प्रमोद सावंत सरकार आता चिरीमिरी गोळा करीत असल्याचा आरोप पणजीकर यांनी केला.
काॅंग्रेस पक्ष २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची उच्चस्थरीय चौकशी करणार असुन, राज्यातुन भ्रष्टाचाराचा संपुर्ण नायनाट करण्याचे काॅंग्रेसचे धोरण असल्याचे सांगुन, पणजीकर म्हणाले, भ्रष्टाचार मुक्त गोवा हा काॅंग्रेसचा वचननामा असेल.दक्षता सप्ताह कार्यक्रमात दक्षता खात्याच्या कामगीरी बद्दल जाणीवपुर्वक बोलण्याचे टाळुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. लोकांची दिशाभूल करण्यासाठी तसेच आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यानी असे केले.
भाजपचे मंत्री, आमदार व पदाधिकारी यांचा सहभाग असलेल्या २१ भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीचे आदेश लोकायुक्तांनी दिले त्याचे काय झाले हे लोकांना जाणुन घ्यायचे आहे. किनारा स्वच्छता घोटाळा, सायबेर एज घोटाळा, बांधकाम कामगार निधी घोटाळा, नगर नियोजन खाते घोटाळा, इफ्फि घोटाळा, स्पेसीस इमारत भाडे घोटाळा, लाईफ गार्ड कंत्राट घोटाळा, पे पार्कींग स्कॅम अशा अनेक प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री त्यावर एक शब्द बोलत नाहीत,याबद्दल पणजीकर  यांनी आश्चर्य व्यक्त केले.
व्होकल फाॅर लोकल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यानी आपलेच लोकल सरकारतील उप-मुख्यमंत्री बाबू कवळेकर हे गांधी जयंती दिनी एका पंचतारांकीत हाॅटेल बाहेर हाय स्पिरीट मध्ये कसे होते तसेच त्यांच्या मोबाईल मधुन एक अश्लिल व्हिडीओ कसा प्रसारीत केला गेला यावर भाष्य करणे गरजेचे आहे अशी मागणी पणजीकर यांनी केली.
आज इतरांना दोष देणाऱ्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या डिफेक्टिव, भ्रष्ट व असंवेदनशील कारभाराला इतरांना जबाबदार धरु नये. लोकांप्रती असंवेदनशीलता दाखवणाऱ्या  ह्या भाजप सरकारला आगामी जिल्हा परिषद, नगरपालीका तसेच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत जनता योग्य धडा शिकवणार असा इशारा  पणजीकर यांनी दिला आहे.