भाजप सरकार अल्पसंख्यांक विरोधी:काँग्रेसचा आरोप

0
884

गोवा खबर:गो रक्षकांकडून होत असलेल्या सतावणूकीच्या विरोधात बीफ विक्रेत्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला असला तरी सलग तीन दिवस चाललेल्या संपामुळे बीफ विक्रेत्यांकडे बीफचा साठाच नसल्याने आज देखील बीफची दुकाने बंद राहिली.सरकारने हा प्रश्न सोडवण्यात फरसा रस न दाखवल्याने काँग्रेसने भाजप सरकार हे अल्पसंख्याक आणि गरीब लोकां विरोधात असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसतर्फे आज माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांनी बीफ तूटवड्यावरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला.सार्दिन म्हणाले, बीफ हे अल्पसंख्यांक आणि गरीबांचे अन्न आहे.भाजप आघडी सरकार अल्पसंख्यांक आणि गरीबां विरोधात असल्याने त्यांना बीफ पुरवठा सुरळीत करून हा प्रश्न सोडवण्यात रस नाही.ही परिस्थिती अशीच राहिली तर बीफच्या पदार्थांची किंमत वाढणार आहे.एकदा वाढलेले दर पुन्हा कमी होणार नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे.सरकारने बीफला पर्याय म्हणून मटणाच्या किंमती बीफ एवढया कमी केल्या तरी आमची हरकत नाही.मात्र त्यात देखील सरकारला रस नाही.
काही एनजीओ केवळ ब्लैकमेल करून पैसे कमावण्याचे काम करतात.अशा मंडळीना कायदा हातात घेण्याचे अधिकार कोणी दिले असा प्रश्न उपस्थित करून सार्दिन म्हणाले,आम्हाला संशय आहे की सरकारच्या पाठिंब्यावरच तथा कथित गो रक्षक कायदा हातात घेऊन वातावरण बिघडवत आहेत.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातील बाहुले असल्यानेच ते या कथित गो रक्षकांवर कारवाई करण्याची हिंम्मत दाखवत नाहीत.
सरकारने हा प्रश्न तात्काळ सोडवून बीफ खाणाऱ्यांची गैरसोय दूर केली नाही तर काँग्रेसला पुढची पावले उचलावी लागतील असा इशारा सार्दिन यांनी यावेळी दिला.