भाजप सरकारला भ्रष्टाचाराचा “कामगिरी अहवाल” जाहिर करण्याचा राज्यपालांनी आदेश द्यावा:काँग्रेस

0
360
गोवा खबर : सन २०१२ पासुन सत्तेत असलेल्या भाजपने भ्रष्टाचारात उच्चांक गाठला आहे. भानगडी, घोटाळे व गौडबंगालाच्या भाजप राजवटीला आता चक्क लोकायुक्तांकडुन प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्यामुळे गोव्याचे राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी डाॅ. प्रमोद सावंत यांना भ्रष्टाचाराचा ” कामगिरी अहवाल” प्रसिद्ध करण्याचा आदेश द्यावा. लोकायुक्तानी आजपर्यंत एकुण किती प्रकरणांत चौकशी आदेश दिले व सरकारने कोणती कारवाई केली हे सरकारला उघड करण्यास राज्यपालांनी सांगावे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 
भाजप पदाधिकाऱ्याच्या फॅक्टरीत सापडलेले कॅटामाईन ड्रग्स, पणजी स्मार्ट सिटी स्कॅम, सायबर एज घोटाळा, तिसऱ्या मांडवी पूलावरील वीज खांब घोटाळा, मिरामार-दोनापावला रस्ता घोटाळा, पाटो येथिल स्पेसीस इमारतीचे कोट्यावधी भाडे देण्याची भानगड, साळगाव कचरा प्रकल्प घोटाळा, पर्यटन खात्यातील इव्हेंट मॅनेजमेंट विदेश वारी खर्च घोटाळे अशी अनेक प्रकरणे आज भाजप सरकारच्या नावांवर नोंद झाली आहेत,असे सांगून चोडणकर म्हणाले, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भ्रष्ट कारभाराचा वारसा लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पूढे नेला व डाॅ. प्रमोद सावंत आज पूढे चालवित आहेत.
चोडणकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या मेहूण्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलेले प्रकरण, पणजी पार्कींग फीचे स्ट्रेड डील प्रकरण भाजपच्या कारकिर्दीत घडली. काॅंग्रेस सरकारने लोकभावनांचा आदर करुन रद्द ठरविलेल्या सेझ भूखंड धारकाना जनतेच्या पैशातुन व्याजापोटी कोटींचे व्याज देण्याची भानगड भाजप सरकारनेच केली. राष्ट्रिय क्रिडा स्पर्धांच्या साधन सुविधा निर्माण करताना लाचखोरीने कामाचा दर्जा खालावल्याचे फातोर्डा स्टेडियमवरचे ३०० पत्रे उडुन गेल्याने सिद्ध झाले आहे. पर्यटन खात्याचे किनारे जीवरक्षकांचे कंत्राट भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे.
म्हादई प्रश्नी कायदेशीर सल्लागारावर कोट्यावधीचा खर्च, फोर्मालीन स्कॅम, प्रादेशीक आराखडा व जमीन रुपांतर घोटाळा, इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड स्कॅम असे अनेक घोटाळ्यांचा विक्रम भाजपने आठ वर्षात केला आहे,याची आठवण चोडणकर यांनी करून दिली आहे.
आज प्रमोद सावंत भ्रष्टाचाराचा हा वारसा समर्थपणे पूढे नेत आहेत हे खेदानेच म्हणावे लागते,असे सांगून चोडणकर म्हणाले, आता तर चक्क भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी अण्णा हजारेंच्या जगप्रसिद्ध आंदोलनाने निर्माण करण्यात आलेल्या लोकायुक्तानी या सरकारला भ्रष्टाचाराचे प्रशस्तिपत्रक दिले आहे.
गोव्यातील खाण लिजेस प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस करणारा अहवाल लोकायुक्तानी राज्यपालाना पाठवला आहे. यापुर्वी त्यानी बिच क्लिनींग व सायबर एज योजनेची चौकशी करण्याचे आदेश देणारे अहवाल सरकारकडे दिले होते. परंतु सरकार त्यावर गप्प आहे,असा  आरोप चोडणकर यांनी केला.
कोविडच्या संकट काळातही जनतेच्या पैशांची लूट करणे भाजपने थांबवले नाही,अशी टिका करून चोडणकर म्हणाले, लाॅकडाऊनच्या सुरूवातीला जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करणाऱ्या मंत्र्यांच्या चित्रफीती गोवेकरांनी पाहिल्या. कोविड टेस्टिंग सामग्री खरेदीतही गौडबंगाल असुन, निवारा केंद्रात ठेवलेल्या मजूरांना देण्यात येणाऱ्या जेवण-पाणी-नाश्ता पुरवण्याच्या कंत्राटातही भानगड आहे व म्हणुनच सेवाभावी संस्थाना तेथे भूकेल्यांना जेवण द्यावे लागत आहे. कोविड टेस्टिंग व कोविड वाॅर्डात झालेले मृत्यू यावर भाजप सरकारने भानगडी केल्या आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक डाॅक्टरला वाचविण्यासाठी भाजपने चौकशी समिती गुंडाळली व सदर डाॅक्टरचे निलंबन मागे घेतले हे लोक विसरलेले नाहीत.
डाॅ. प्रमोद सावंत सरकारातील मंत्री मायकल लोबो, बाबू आजगावकर, निलेश काब्राल यांनी सरकारी नोकऱ्या विकल्या जातात, ड्रग्स व वेश्या व्यवसाय सरकारच्या आशिर्वादानेच चालत आहेत, पोलीस हप्ते घेतात हे उघडपणे मान्य केले आहे. उप-सभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या पुत्राच्या बोगस डिग्री प्रमाणपत्राने, भाजपच्या राष्ट्रिय नेत्यांची फेक डिग्रींची परंपरा गोव्यातही भाजप चालवित आहे हे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या  मतदारसंघातील माजी सरपंचाला
मजूरांसाठीचे ६ हजार रुपये दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे गौडबंगालात बुडालेल्या भाजप सरकारचा भ्रष्टाचाराचा अहवाल उघड होणे महत्वाचे आहे,अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.