भाजप सरकारला भाज्यांचे दर रोखण्यात अपयश:आप

0
1144
गोवा खबर:  भाज्यांचे दर विशेषतः कांद्याच्या किंमती भरमसाठ वाढत असून त्या कमी करणे सरकारला जमत नाही,असा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पणजी येथे रॅली आयोजित करून  सरकारचा निषेध केला.
 यावेळी आम आदमी पक्षाच्या महिला विभागाच्या नेत्या  उमा वळवईकर आणि पॅट्रिसिया फर्नांडिस यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमा वळवईकर म्हणाल्या, राज्यात भाज्यांचे, विशेषतः कांद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. एका सर्वसामान्य घरामध्ये दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही त्यामुळे कठीण बनलेले आहे. गोवेकरांना याही पुढे जाऊन जगणेच मुश्किल झाले आहे. कोविड महामारी आणि त्या अनुषंगाने आलेल्या आर्थिक मंदीमुळे आर्थिक व्यवस्था कोसळल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून अनेक व्यवसायांना मार बसला आहे. बरेच व्यवसाय बंद पडले आहेत.
 राज्य सरकारला सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणे कधीही जमलेले नाही,असा आरोप करून वळवईकर म्हणाल्या, लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात म्हणून सरकारने कधी प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्ष मुख्यमंत्र्यांकडे  मागणी करीत आहे की त्यांनी याविषयी तातडीने पाऊले उचलताना भाजीपाला आणि इतर घरगुती पदार्थांच्या किंमती सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी व्यवस्था करावी.
 फर्नांडिस म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी गोवा आणि गोवेकरांचे हित आधी बघितले पाहिजे. आमच्या कल्याणसाठी महत्व द्यायला हवे, अदानीच्या हिताला नव्हे. कांदा आणि इतर भाज्यांच्या किंमती त्यांनी तातडीने कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत.