भाजप सरकारने राहुल गांधींचा आवाज ऐकला असता तर देशात आज  कोविडची परिस्थिती वेगळी असती : दिगंबर कामत

0
227
गोवा खबर : केंद्रातील बेजबाबदार भाजप सरकारमुळे आज देशात परत एकदा कोविडची स्थिती गंभीर झाल्याने लोक भयभीत झालेले आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना हाताळणी बद्दल केलेल्या सुचना केंद्र सरकारने मान्य केल्या असत्या तर देशात आज दिलासादायक परिस्थिती दिसली असती असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजेच देशव्यापी लॉकडाऊन जाहिर होण्याच्या तब्बल ४१ दिवस अगोदर केंद्र सरकारला कोरोना संकटाची सुचना दिली होती व सरकारने या रोगावर गांभीर्याने विचार करावा व देशातील अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची मागणी केली होती असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
दुर्देवाने केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधींच्या सुचनांकडे दुर्लक्ष केले व “टाळी बजाव, थाली बजाव, दीया जलाव” उत्सव साजरे करण्यावर भर देत, लोकांना कोविड महामारीत ढकलले असे दिगंबर कामत म्हणाले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्रातील भाजप सरकारला कोविड हाताळणी सबंधी अनेक बहुमूल्य सल्ले दिले.  मागच्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारकडे इतर कोविड लसीना मान्यता देण्याची मागणी केली होती. परंतु केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने केंद्र सरकारला राहुल गांधीची सुचना मान्य करण्याची सुबुद्धी आली व त्यांनी रशियेच्या स्पुटनिक व्ही या लसीचा आपत्कालीन वापर करण्यासाठी मान्यता दिली असे दिगंबर कामत म्हणाले.
भाजप सरकारने आता उत्सवी वातावरणातुन बाहेर यावे  व कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना ९ एप्रिल २०२१ रोजी लिहीलेल्या पत्रातील सात मागण्या  मान्य कराव्यात अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
केंद्र सरकारने लसी तयार करणाऱ्या उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी जेणेकरुन लस उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल, कोविड लसींची निर्यात बंद करावी, कोविड लस तयार केलेल्या इतर उत्पादकांना मान्यता द्यावी, सामाजीक लसीकरण मोहिम हाती घ्यावी, लस खरेदी करण्यासाठी दुप्पट निधीची तरतुद करावी, राज्य सरकारांचा लस खरेदी व वाटणीत जादा सहभाग घ्यावा व कोरोना महामारीत संकटात असलेल्या सामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थ सहाय्य करावे असे सात मुद्दे राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांकडे मांडले आहेत असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.
भाजप सरकारने योग्य शहाणपणा दाखवुन या सात मागण्या मान्य करुन त्या चालीस लावल्यास देशातील परिस्थिती चांगल्यासाठी नक्कीच बदलेले असा विश्वास दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
गोव्यातील राज्य सरकारने आतातरी लोकांप्रती संवेदनशीलता दाखवुन, राजकीय फायद्याच्या उत्सवी वातावरणातुन बाहेर यावे  व कोविड लसीकरण मोहिम सर्वांना विश्वासात घेवुन राबवावी तसेच अर्थ व्यवस्था परत उभारण्यासाठी योग्य दिशा ठरवावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. सरकार आता जागे न झाल्यास गोमंतकीयांना महाभंयकर संकटाला सामोरे जावे लागणार असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.