भाजप सरकारने दादागीरी बंद न केल्यास जनता रस्त्यावर उतरणार : काँग्रेसचा इशारा

0
393
गोवा खबर: कोविड संकट हाताळण्यात आलेले अपयश व राज्य सरकारची दिवाळखोरी तसेच भाजपातील अंतर्गत वाद यामुळे वैफल्यग्रस्त बनलेले मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचा प्रशासनावरचा ताबा सुटला आहे.काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व सहकाऱ्याना झालेली अटक हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. भाजप सरकारने दादागीरी बंद न केल्यास जनताच रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. 
वास्को परिसरातील मांगोर भागात कोविडचे रुग्ण सापडल्यानंतर लाॅकडाऊन काळात झोपा काढणारे गोव्यातील भाजप सरकार खडबडुन जागे झाले व चाचणी तथा विलगीकरण व्यवस्था करण्यासाठी धडपडु लागले. परंतु, कोविड संबंधी लोकांना विश्वासात घेण्याचे सौजन्य या सरकारने न दाखवल्याने तसेच मुख्यमंत्र्या सहित इतर मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने यामुळे जनतेचा या सरकारवरचा विश्वास पुर्णपणे ढासळला आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
चोडणकर म्हणाले, त्यातच वास्कोवासीयांची लाॅकडावनची मागणी धुडकावून लावत, तेथे कोविड सेंटर उघडण्याचे सरकारने जाहिर केल्याने लोकांचा संताप अनावर झाला आहे. लोकांचा आवाज सरकारकडे पोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व सहकाऱ्यानी पत्रकार परिषद घेऊन केले. केवळ याच कारणांसाठी त्यांना काल मध्यरात्री अटक करुन पहाटे सोडणे धक्कादायक आहे . सरकारने जनतेचा न्याय मागण्यांसाठीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करु नये.
कोविड संकटकाळातही मुख्यमंत्र्यांसहित भाजपचे सर्व मंत्री व आमदार भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत. वास्कोतील कोळसा वाहतुकीत मुख्यमंत्र्यांचे हितसंबंध असल्याचे संकल्प आमोणकर यांनी जाहिर केल्याने, आपले बिंग फुटल्याचा राग धरुन डाॅ. प्रमोद सावंत यांनी संकल्प आमोणकर व इतरांना अटक केली आहे,असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.