भाजप सरकारच्या मागील ८ दिवसातील उद्घाटन व पायाभरणी समारंभातील सर्व उपस्थितांची कोविड चाचणी करा : काँग्रेसची मागणी

0
622
गोवा खबर :गोव्यात सामाजीक संसर्गाचा संशय असलेले कोविडचे रुग्ण आढळल्याने एक नवे संकट भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे गोमंतकीयां समोर उभे झाले आहे. भाजपच्या बेजबाबदार वागणुकीने आज समस्त गोमंतकीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सरकारने मागील आठ दिवसात आयोजित केलेल्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमांत उपस्थित सर्वांची कोविड चाचणी करावी,अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या बेजबाबदार नेतृत्वाने आज गोव्याला परत एकदा कोविडच्या संकटात लोटले आहे,असा आरोप करून पणजीकर म्हणाले, एवढे दिवस शिस्तीने सर्व प्रकारची खबरदारी घेऊन लाॅकडाऊन पाळलेल्या गोमंतकीयांचा भाजप सरकारने विश्वासघात केला आहे.
भाजप सरकार आज सामान्यांप्रती असंवेदनशील बनले आहे. लोकांच्या जीवाशी खेळ मांडुन आपले राजकीय इस्पित साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.