भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील जैवविविधता धोक्यात:शिवसेना

0
1758
गोवा खबर:गोव्यात पट्टेरी वाघांसारखी दुर्मीळ होत चाललेली प्रजातीच नव्हे तर गोवा सरकारच्या उदासीनतेमुळे संपूर्ण जैवविविधताच धोक्यात असल्याचा आरोप शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केला आहे.
म्हादई अभयारण्यातील पट्टेरी वाघांची झालेली हत्या हा पूरावा आहे की जंगलातील दुर्मीळ प्रजातीच्या संरक्षणार्थ सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशी टीका कामत यांनी केली आहे.
विकासाच्या नावाखाली होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे नैसर्गिक वनस्पती नष्ट होत आहे. म्हादई नदीचे पाणी वळवल्यामुळे भविष्यात पाणी, वन,पशु, पक्षी,मासे, जीव-जंतू यांचे अस्तित्त्व देखील धोक्यात येणार आहे.राज्यातील जैवविविधतेची नासाडी सरकारच्या उदासीनतेमुळे आताच सुरू झाली आहे, असा आरोप  कामत यांनी केला आहे. जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणतेच धोरण सरकारकडे नाही याची खंत कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळवली येथे विष प्रयोगाने मारल्या गेलेल्या वाघांची संख्या चारवर पोचली असून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टिका करत गोव्यासाठी ही धोक्याची घंटा ठरेल, अशी भीती देखील व्यक्त केली आहे.