भाजप सरकारचा बिगरगोमंतकीयांच्या उद्योगांना पूर्ण पाठिंबा: आम आदमी पक्षाची टीका

0
423
गोवा खबर: भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून गोमंतकीय उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या मागण्या व आवाजाकडे दुर्लक्ष केला जात आहे. मात्र बिगर गोमंतकीय व्यावसायिकांनी केलेल्या विनंत्यांना लगेच प्रतिसाद दिला जात आहे,असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने सरकारकडून कसिनो व्यावसायिकांना 277.08 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयावर सरकारला धारेवर धरले आहे.
आप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे म्हणाले, यावर्षीच्या मार्च महिन्यापासून लघु उद्योग आणि लहान व्यवसाय सांभाळणारे व्यावसायिक लॉकडाउनमुळे कसेतरी तग धरून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला काहीतरी आर्थिक साहाय्य भरपाई म्हणून देण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत,मात्र  भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.राज्यात आर्थिक संकट असल्याचे निमित्त पुढे करीत या विनंत्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद देण्याचे नाकारले आहे.दूसरीकडे कॅसिनो मालकांकडून येणे असलेली थकबाकी  तब्बल 277.08 कोटी रुपये वार्षिक शुल्क म्हणजेच एन्युअल रिकरिंग फी चक्क माफ करण्यात आली आहे. हे शुल्क वसूल करण्यासंदर्भात सरकारच्या दोन मोठ्या खात्यांमधून सरकारला सल्ला आलेला असताना सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही.
राज्यातल्या कुठल्याही  केवळ हे शुल्क माफ करण्याचा नतद्रष्टपणाच करण्यात आलेला नाही, वरून ही सर्व रक्कम देणेकरी असलेल्या कॅसिनो मालकांना “प्रो रेटा बेसिस “वर मासिक हप्ते तत्वावर भरण्यास सूट दिली आहे. पण मूळ नियमाप्रमाणे सध्याची शुल्क भरण्याची पद्धत संपूर्ण रक्कम आगाऊ भरणे तेही व्यवसाय वा उद्योग सुरू करण्याच्यापूर्वी भरणे, असा नियम आहे, याकडे लक्ष वेधुन तिळवे म्हणाले,  गृह खाते आणि वित्त खाते यांनी अशा प्रकारच्या शुल्क माफीला तीव्रपणे विरोध दर्शविलेला आहे. वित्त खात्याकडून या गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करण्यात आले आहे . यामुळे राज्याकडे येणारा महसूल केवळ 72.92 कोटी एवढाच असेल. पण अपेक्षित रक्कम 350 कोटी रुपये एवढी आहे.
 मुख्यमंत्र्यांनी कुठल्या आधारावर कॅसिनो मालकांना एवढा दिलासा दिलेला आहे, त्याचवेळी गोव्यातील उद्योजकांना मात्र असा दिलासा कधी दिल्याचे ऐकिवात नाही. ते गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की बिगरगोमंतकीय आणि बाहेरच्या लोकांचे, असा संतप्त सवाल तिळवे यांनी करताना प्रवास आणि पर्यटन यामध्ये गुंतलेले गोवेकर नागरिक आता बाजारात भाजी आणि मासे विकत असल्याचे नमूद केले.
महामारीमुळे गोमंतकीय उद्योग कोसळलेले आहेत ज्यामुळे बेरोजगारी निर्माण झालेली आहे.उद्योग करण्याची सुसह्यता या यादीमध्ये गोव्याचा क्रमांक 21 वरून 24 व्या स्थानावर घसरलेला आहे. भाजप आमदार ग्लेन टिकलो जे गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी  मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राज्यामध्ये व्यवसाय आणि उद्योग चालायला देतच नाहीत,असे जाहिर भाष्य केले आहे,याकडे तिळवे यांनी लक्ष वेधले. भाजप हे फक्त गोवेकरांकडून सत्तेवर येण्यासाठी मते घेत असून गोव्याच्या लोकांसाठी काम अजिबात करीत नाही असा आरोप करून तिळवे यांनी लॉकडाउन झाल्यापासून सरकारने गोवेकरांसाठी काय काय केले याची यादी सादर करावी, असे आव्हानही तिळवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
भाज्यांसह सगळ्या गोष्टींच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. वीज बिलामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेन्शन अडवून ठेवण्यात आले आहे. दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजनेच्या अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ गुंडाळण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक गोवेकरांना जीवन जगणे अतिशय कठीण बनले आहे, असा आरोप तिळवे यांनी केला.
 अशा प्रकारचा भेदभाव गोमंतकीय जनता सहन करणार नाही. सरकारने तातडीने काहीतरी आर्थिक मदत आणि आर्थिक सूट गोव्यातील स्थानिक गोमंतकीय व्यावसायिकांसाठी आणि उद्योग मालकांसाठी जाहीर करावी, अशी मागणी  तिळवे यांनी यावेळी केली.