भाजप सरकारचा पावर प्लग गोमंतकीय लवकरच काढणार : अमरनाथ पणजीकर

0
316
गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेने कळस गाठला आहे. गोमंतकीय जनता या भ्रष्ट व लोक विरोधी सरकारचा पावर प्लग लवकरच काढल्या शिवाय राहणार नाही,अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
 वीज मंत्री निलेश काब्राल यांनी मोले प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांनी आपली वीज जोडणी तोडावी, असे वक्तव्य केले होते त्याचा निषेध करताना पणजीकर यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
केंद्रातील मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर दबाव टाकुन आपल्या क्रोनी कॅपिटलीस्ट मित्रांच्या फायद्यासाठी रेल्वे दुपदरीकरणास  परवानगी देण्यास सांगत आहे, असा दावा पणजीकर यांनी केला आहे.
भाजप सरकारचे मुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री व भाजप पदाधिकाऱ्यांना मोले अभयारण्य नष्ट करुन तेथे उभारण्यात येणाऱ्या तिन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी मोदींच्या क्रोनी कॅपिटलीस्ट कडुन मोठ्या रकमेची ॲाफर देण्यात आली आहे. त्यामुळेच भाजप आज या प्रकल्पांना पाठिंबा देत आहे असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.
गोव्यात किती घरगुती, व्यावसायीक व औद्योगीक वीज जोडण्या दिलेल्या आहेत तसेच या सर्वांकडुन प्रत्येकी किती वीजेचा वापर होतो याची आकडेवारी सरकारने जनतेसमोर ठेवावी. सरकारने वीज चोरी रोखण्यासाठी काय उपाय योजना केली आहे ते वीज मंत्र्यानी स्पष्ट करावे अशी मागणी  पणजीकर यांनी केली आहे.
गोव्यातील भाजप सरकार आज मोठ्या उद्योगांना वीज बिले न भरल्यास कोणतीच कारवाई न करता मोकळे सोडत आहे, परंतु कोविड संकटकाळात आर्थीक बोज्याखाली असलेल्या सामान्य माणसांच्या घरगुती वापराचे बील भरण्यास थोडा वेळ झाल्यास वीज खाते त्यांची सतावणुक करते,असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही विचार न करता जाहिर केलेल्या राष्ट्रव्यापी लॅाकडाऊनने देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. आज सामान्य लोकांना आर्थीक मदत देवुन दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे पणजीकर यांनी म्हटले आहे. लोकांना दोष देण्याचा भाजपवाल्यांना नैतीक अधिकार नाही असे ते पुढे म्हणाले.
काँग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनुन जनहित विरोधी व पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्रकल्पांना कायम विरोध करणार असल्याचे सांगून पणजीकर म्हणाले, गोव्याची अस्मीता सांभाळण्यास आम्ही वचनबद्द आहोत.