भाजप नेते अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन

0
967
 गोवा खबर:  देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
एम्सकडून त्यांचे १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष  अमित हैदराबाद दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचा दौरा आटोपून ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा अजून  बहारीन  दौरा बाकी आहे. त्यामुळे दौरा सोडून मायदेशी परतणार का? हे निश्चित  नाही.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

अरुण जेटलींवर २०१८ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. खराब प्रकृतीमुळे त्यांनी १७ व्या लोकसभेच्या निवडनुकीत सहभाग घेतला नव्हता. त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. २०१४ च्या मोदी सरकारमध्ये त्यांनी अर्थ आणि संरक्षण ही महत्वाची दोन खाती सांभाळली होती.

दिल्ली विद्यापीठातून विद्यार्थी नेते म्हणून अरुण जेटली यांनी राजकीय करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकिल म्हणूनही काम केले आहे. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.

 अरुण जेटली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय :
– नोटबंदी  
– वस्तू व सेवा कर प्रणालीची देशभर अंमलबजावणी 
– रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट 
– देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय