भाजप कोअर कमीटी बैठकीवर पार्सेकरांचा बहिष्कार

0
2282
गोवा खबर:काँग्रेसचे आमदार असलेल्या दयानंद सोपटे यांना आपल्याला विश्वासात न घेता भाजप मध्ये घेऊन आपली राजकीय कारर्किद संकटात आल्याने नाराज असलेल्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
उपचार आणि विश्रांती घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हळूहळू सक्रिय होऊ लागले आहेत.गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि मंत्रीमंडळाची बैठक लगोपाठ दोन दिवस घेतल्या नंतर आज मुख्यमंत्र्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली होती.पार्सेकर यांना निमंत्रण असून देखील ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
बैठक संपल्या नंतर फोन वरुन पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता पार्सेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
तुम्हाला बैठकीचे निमंत्रण नव्हते की तुम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला,असा प्रश्न केला असता पार्सेकर म्हणाले,तुम्ही तस समजू शकता.सध्या कोअर कमिटीला काही अर्थ उरलेला नाही.कोअर कमिटी मध्ये चर्चा करून जर निर्णय घेतले जात नसतील तर त्या कमिटीला अर्थच काय उरतो. त्यांना करायचे ते अगोदर ठरलेले असेल तर कोअर कमिटीला अर्थच राहत नाही.अशा बैठकीला गेले काय न गेले काय ते सारखेच.फक्त कोणी तरी घेतलेल्या निर्णया वर मान हलवत राहिलो तर वेळ निघुन गेल्या शिवाय राहणार नाही.
पार्सेकर यांनी आपल्या नाराजीचा सुर कायम ठेवत पक्षा विरोधात भूमिका घेतली तर भाजपला मांद्रे मतदार संघातुन सोपटे यांना निवडून आणणे कठिण होणार आहे.मुख्यमंत्री पर्रिकर यांनी बोलावलेल्या बैठकीवर पार्सेकर यांनी बहिष्कार टाकल्याने आता हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.