भाजप आघाडीत बिघाडी; मगोकडून अपक्ष मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी

0
743
गोवा खबर: दीर्घकाळ सुरु असलेल्या आजारपणामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची सरकार वरील पकड ढीली झाली आहे.कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत अपक्ष मंत्री गोविंद गावडे यांनी मगो नेते सुदिन ढवळीकर यांना केलेल्या शिवीगाळीचे पडसाद आता उमटू लागले आहेत.आज मगोने गावडे यांच्या कृतीचा निषेध करत त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री पर्रिकर यांनी काल 5 महिन्यां नंतर प्रथमच मंत्रालयात मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन केले होते.आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या 2 मंत्रीमंडळ बैठकी आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी घेतल्या होत्या.त्यामुळे काल मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.पर्रिकर यांनी ही बैठक कशी घेतली यापेक्षा ढवळीकर आणि गावडे यांच्यात विकासकामां वरुन शिवराळ भाषेत झालेल्या हमरी तुमरी वरुन चांगलीच गाजली.
मुख्यमंत्री पर्रिकर हे कडक स्वभावासाठी ओळखले जातात.त्यांच्या समोर कनिष्ठ मंत्र्यने ढवळीकर यांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शिवीगाळ करत आक्रमक भूमिका घेतल्याने सगळेच मंत्री आश्चर्यचकित झाले आहेत.ढवळीकर यांनी काल यावर जास्त काही भाष्य न करता केवळ नाराजी व्यक्त केली होती.
मगो पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या समोर घड़लेला प्रकार गंभीर आहे.कालच्या प्रकारा मुळे गोव्याची मान शरमेने खाली गेली आहे.भविष्यात असे प्रकार घडू नयेत आणि असे प्रकार करणाऱ्यांसाठी कडक संदेश जावा यासाठी गोविंद गावडे यांची मंत्रीमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीरपणे घेऊन गावडे यांच्यावर कडक करवाई केली नाही तर 4 दिवसांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढची पावले उचलली जातील,असा इशारा देखील सावंत यांनी दिला आहे.त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.
गोविंद गावडे हे प्रियोळ मतदारसंघातून मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.त्यामुळे निवडणुकी पासून गावडे आणि ढवळीकर यांच्यात राजकीय खटके उडत असतात.काही दिवसांपूर्वी गावडे यांनी सुदिन ढवळीकर यांच्यावर तोंडसुख घेतले होते.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत त्याची पुढची आवृत्ती घडल्याचे सांगितले जात आहे.
मगो पक्षाचे अध्यक्ष असलेल्या दीपक ढवळीकर यांनी शिरोडा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्याची भाषा करून मोर्चेबांधणी सुरु केल्यामुळे भाजप समोर देखील संकट निर्माण झाले आहे.गोवा फॉरवर्ड नेते तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई हे देखील सुदिन ढवळीकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून अलीकडेच सरदेसाई यांनी देखील ढवळीकर यांना खडे बोल सुनावले  असल्याची चर्चा आहे.
आजारपणामुळे मुख्यमंत्री पर्रिकर यांची सरकार वरील पकड़ ढीली पडली असून त्यामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.