भाजप अध्यक्ष अमित शहांवर कोर्टाच्या अवमानप्रकरणी कारवाई व्हावी:शिवसेना

0
1554

गोवा खबर:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मधील निवडणूक प्रचारात गोव्यातील म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्याची केलेली भाषा शिवसेनेला अजीबात रुचलेली नाही.म्हादई पाणी वाटपा संदर्भात जल लवादा समोर केस सुरु असताना शहा यांनी भाजपची सत्ता आली तर सहा महिन्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ असे आश्वासन दिले आहे.त्यांचे हे आश्वासन म्हणजे कोर्टाचा अवमान असून कोर्टाने सुमोटो पद्धतीने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कोर्टाच्या अवमान प्रकरणी कारवाई करायला हवी,अशी मागणी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.शिवसेना यासंदर्भात कोर्टाला पत्र लिहून लक्ष वेधणार असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले.
कामत म्हणाले,म्हादई नदी ही गोमंतकीयांसाठी जीवनदायीनी आहे.70 टक्के लोक प्रत्यक्ष तर उर्वरित 30 टक्के लोक अप्रत्यक्षरित्या म्हादई नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असे कामत म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी म्हादई पाणी वाटपाचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर तडजोड करून सोडवला जाईल असे वक्तव्य कर्नाटक मधील प्रचारात केले होते.शिवसेनेने त्यावर नाराजी व्यक्त करत मोदी यांचा देखील निषेध केला आहे.मोदी हे फक्त भाजप नेते नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत हे त्यांनी विसरु नये असे शिवसेनेने ठणकावून सांगितले आहे.
काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यासंदर्भात केलेल्या विधानावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून गोव्यातील भाजपा या संदर्भात सहमत आहे की नाही हे 72 तासात जाहीर करावे अशी मागणी केली होती.
निवडणुका कर्नाटक मध्ये असल्या तरी म्हादईच्या पाण्यावरुन गोव्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे.अमित शहा 13 मे रोजी एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत असून त्यावेळी देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.