भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडून गोव्यातील निवडणूक तयारीचा आढावा

0
98
  • बी. एल. संतोष यांनी आमदारांसोबत घेतली बैठक
  • उद्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
गोवा खबर : मार्च 2022 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाजपाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत भाजपाचे गोवा निरीक्षक सी.टी.रवी आहेत. पणजी येथील सरकारी अतिथी गृहावर त्यांनी रात्री उशिरा भाजपाच्या आमदारांची बैठक घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि संघटन मंत्री सतीश धोंड यांनी संतोष यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर पणजी येथील सरकारी अतिथी गृहावर भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि सर्व आमदार बैठकीस उपस्थित होते.
उद्या भाजपा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांशी संतोष संवाद साधणार असून त्यानंतर ते दिल्लीस रवाना होणार आहेत.
गोव्यात मार्च 2022 मध्ये निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघटनमंत्री असलेले बी. एल. संतोष गोव्यात दाखल झाले असून ते आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत.
गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारवरील लोकांची नाराजी असून त्याचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी विशेष रणनीती ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.