गोवा खबर:गोवा-मुंबई महामार्गाच्या पेडणेमधील सदीबाग पोरसकडे येथे नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या रस्त्याचा भाग कोसळणे ही भाजपा सरकारच्या आवडत्या कंत्राटदाराने, म्हणजेच एम. वेंकट राव इन्फ्रा प्रोजेक्ट्सने (एमव्हीआरने)  गोवेकरांना दिलेली भेट आहे. कामाच्या निकषावर आणि पर्यवेक्षणा विरोधात स्थानिक अनेक महिन्यांपासून आवाज उठवत होते.मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. काल रात्री उशिरा झालेल्या  धोकादायक घटनेत जीव सहज गमावले गेले असते, त्या जिवांसाठी कोण जबाबदार असणार होते, असा प्रश्न उपस्थित करत आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
 आपचे नेते सुनील सिग्नापूरकर म्हणाले, हलक्या दर्जाच्या कामासाठी एमव्हीआर कुप्रसिध्द आहे. कित्येक वर्षांपासून ठरवून दिलेल्या मुदतीत काम न करण्यास कुख्यात आहे आणि काही बाबतींत विनाकारण मुद्दे निर्माण करून कामे अर्धवट सोडली आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांना हाताळण्यासाठी एमव्हीआरकडे तांत्रिक पार्श्वभूमी किंवा कौशल्य नाही आणि संपूर्ण कराराच्या नफ्याच्या लाभ घेताना कामे पूर्ण करण्यासाठी उप-कंत्राटदारांचा वापर करतात असा आरोप सिग्नापूरकर यांनी केला आहे.
गोव्यातील एमव्हीआरच्या बऱ्याच प्रकल्पांबाबत अनेक तक्रारी असल्याने एमव्हीआरला त्वरित काळ्या सूचीत आणण्याची गरज आहे,अशी मागणी सिग्नापूरकर यांनी केली.
 कुर्टी-खांडेपार महामार्गाची पाईपलाईन कोसळल्याने तिसवाडी पाणी संकटाला सुरुवात झाली होती,गोंवडाळी पूल ज्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत आणि दुरुस्तीसाठी वारंवार बंद करावा लागतो, मिरामार-दोनापावल काँक्रिटच्या रस्ता आपत्ती ठरत आहे,दोनापावल जेट्टी कोसळली आहे,कला अकादमी जेटी कोसळली आहे, ओल्ड गोवा बायपासवरील चिंबल येथील फ्लायओव्हर पायाभूत समस्येनंतर सोडण्यात आला आहे,दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अर्ध्यावर सोडण्यात आली होती, लोटली-कुठ्ठाळी लिंक रोडच्या दोषपूर्ण भिंती अशी तक्रार असलेल्या कामांची यादीच सिग्नापूरकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
एमव्हीआर वर केवळ कोणतीही कारवाई झालेली नाही इतकेच नव्हे, तर भाजप सरकार एमव्हीआरला अजूनही वेगवेळ्या प्रकल्पांची कामे देत आहे याबद्दल आपने खेद व्यक्त केला. खासगी सल्लागारांकडून एमव्हीआरच्या गुणवत्तेची चौकशी करावी व सर्व कामे त्वरित थांबविण्यात यावीत, तसेच पीडब्ल्यूडीचे अभियंता ज्यांनी आपली देखरेखीची जबाबदारी सोडली आहे त्यांना जबाबदार धरले जावे व कर्तव्यात हयगय केल्यासाठी निलंबित करावे अशी मागणी सिग्नापूरकर यांनी केली.
कॉंग्रेसविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणे उपस्थित करुन सत्तेत आलेल्या भाजपामध्ये भ्रष्टाचाराची परिपूर्ण कला असल्याचे दिसून आले आहे आणि या प्रक्रियेत गोवेकरांचे प्राण गमावले तरी ते थांबवण्याची शक्यता दिसत नाही, असे त्यानी म्हटले.