भाजपलाच आधी गुन्हेगारांपासून मुक्त करा :आप

0
510
गोवा खबर: भाजपचे राज्य उपाध्यक्ष तथा गोवा राज्य अनुसूचित जाती व जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष, भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते रमेश तवडकर हे एका कथित मारहाण प्रकरणामध्ये दोषी आढळले असल्याने त्यांनी आपल्या सर्व पदांचा त्वरित राजीनामा द्यावा,अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
 चावडी-काणकोण येथे 2017 साली झालेल्या एका मारहाण प्रकरणात गुंतलेले तवडकर आता त्यामध्ये दोषी असल्याचे आढळून आल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी  सरकार नेहमी कटिबद्ध राहील,असे सांगत असले तरी त्यांच्या मंत्रीमंडळातले मंत्री तसेच त्यांच्या पक्षाचे सदस्य हे  गुन्हेगारी प्रकरणांमध्ये गुंतलेले असून त्यांना मात्र पाठीशी घातले जाते,असा आरोप आपचे युवा नेते संदेश तेलेकर यांनी केला आहे.
  तेलेकर म्हणाले, मुख्यमंत्री सावंत नेहमीच  सरकार राज्यातील गुन्हे रोखण्यासाठी  प्रयत्न करत असल्याचा दावा करतात.प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मंत्रीमंडळातले मंत्री आणि त्यांच्या पक्षातले वरिष्ठ पदाधिकरी हेही गुन्हेगारी प्रवृत्तींच्या कृत्यांमध्ये गुंतलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.
  यापूर्वीही भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे बलात्कार प्रकरणात गुंतलेले होते आणि या प्रकरणात पीडित असलेली मुलगी काही आठवड्यांपूर्वी ती राहत असलेल्या ठिकाणाहून अचानक गायब झाली,याची आठवण करून देत तेलेकर म्हणाले, लहान मुलांची अश्लील चित्रफित समाजमाध्यमांद्वारे पसरवाल्याच्या कथित आरोपाखाली सध्याचे नागरनियोजनमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर वादात अडकले आहेत. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो एका पंचायतीला एका बेकायदा बांधकाम केलेल्या इमारतीसाठी बनावट सही केल्याच्या प्रकरणामुळे नुकतेच वादग्रस्त ठरल्याचे गोमंतकीयांनी पहिले आहे. प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळा मध्येच चारित्र्यावर डाग असलेले व वादग्रस्त मंत्री असल्याचे पाहायला मिळत असल्याने त्याच्याकडून गोवा गुन्हेगारीमुक्त होईल,अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरेल.
मुख्यमंत्र्यांनी  तवडकर यांना सर्व पदा वरुन हटवावे किंवा त्यांना राजीनामा तरी देण्यास सांगावे. तवडकर हे मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये गुंतलेले आहेत. तवडकर सध्या जी पदे प्रशासकीय पातळीवर व संघटना पातळीवर भूषवित आहे, त्या सर्व पदांवरून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्ष करीत आहे, असे तेलेकर म्हणाले.