भाजपने हेडलाईन मॅनेज करणे थांबवावे आणि जीव वाचवावेत! : आप

0
125
गोवा खबर : आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर केवळ हेडलाईन मॅनेज केल्याचा आरोप केला आहे.  राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतःवर होत असलेली टीका टाळण्यासाठी केवळ मीडियामध्ये वेगवेगळे दावे आणि घोषणा करत आहेत. परंतु याचा प्रत्यक्षात लोकांचे जीव वाचविण्यामध्ये किंवा दिलासा देण्यामध्ये  काहीही उपयोग होतं नाही.
म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला होता की, गोव्याच्या ऑक्सिजन कोट्यात २० मेट्रीक टन वाढ करण्यात आली आहे, परंतु अशी “वाढ” केवळ कागदावरच करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र पुरवठा झालेला नाही.
“वाढ करण्यात आलेला कोटा खरोखरच गोव्यात पोहचला आहे का?  हॉस्पिटलमध्ये तो ऑक्सिजन पुरविला गेला आहे का?  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरणे थांबले आहेत का? ” असे प्रश्न उपस्थित करताना राहुल म्हांबरे यांनी ऑक्सिजन बुलेटिनच्या पक्षाच्या दीर्घकाळपासून केलेल्या मागणीची पुनरावृत्ती केली.
मुख्यमंत्र्यांनी, खासगी रुग्णवाहिका आणि शववाहिनीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याच्या योजनेच्या घोषणेसंदर्भात म्हांबरे म्हणाले की, ” नुसत्या योजना जाहीर करण्याची ही वेळ नाही. मुख्यमंत्री जर याबाबत खरोखर गंभीर असतील तर त्याबाबतचे तसे आदेश त्वरित देण्यात यावेत” असे त्यांनी सुचविले.
खासगी रुग्णालयांनी कोविड रूग्णांना जास्त दर आकारणी करण्याच्या तक्रारींचा संदर्भ देताना म्हांबरे म्हणाले की, दर आकारणी नियंत्रणाच्या महत्त्वपूर्ण आदेशांचे मुख्यमंत्री केवळ बातम्या छापल्या गेल्या पाहिजेत, याची काळजी घेत आहेत.  परंतु वास्तवात त्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याचा पाठपुरावा मात्र त्यांच्याकडून केला जात नाही.”
म्हांब्ररे यांनी खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचार दर आणखी कमी करण्याची मागणी केली. कमाल आकारणी दर हे अत्यंत महागड्या खासगी रुग्णालयांच्या आधारे निश्चित केल्यामुळे आता कमी सुविधा असलेली  रुग्णालयेही शासनाच्या आदेशानुसार अधिक दर आकारतात, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
विरोधी पक्षांनीही या विषयावर मौन बाळगल्याबद्दल म्हांबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि खासगी रुग्णालयांमध्ये आर्थिक हितसंबंध (भागधारक) असलेल्या या राजकीय पक्षांच्या तथाकथित “मेडिकल सेल्स” मधील नेत्यांचे याविषयी काही मत आहे की नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
DDSSY योजनेत खासगी रुग्णालयांमध्ये कोविड ट्रीटमेंटचा समावेश असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असूनही त्यापैकी बर्‍याच जणांनी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर आगाऊ रक्कम भरण्याची मागणी केली आहे.  म्हांबरे म्हणाले की, त्यांच्या सूत्रांनुसार रुग्णालयांना गैर-कोविड प्रकरणातही सदर योजनेअंतर्गत खर्चाची भरपाई करून देण्याचा शासनाचा वाईट अनुभव आला आहे आणि त्यांचा आता सरकारवरील विश्वास उडाला आहे.
राहुल म्हांबरे यांनी कोरोना वॉरियर्सच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांच्या ढोंगीपणावर एका धक्कादायक घटनेविषयी प्रकाश टाकला त्यात  भारतीय जनता पक्षाचे समर्थक असलेल्या गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यांनी डॉक्टर आणि नर्स यांना निवासी संकुलातच रहायला लावले. यावर तिळवे म्हणाले की, सीएम सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी अनेक घोषणा केल्या आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन केले मात्र सदर प्रकरणात गुन्हेगार भाजपचा समर्थक आहे, ही निश्चितच लज्जास्पद बाब आहे. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांनी ज्याप्रकारे  परिस्थितीची हाताळणी करताना गोंधळ निर्माण केला त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे आणि अन्य भाजप नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी म्हांबरे  यांनी केली.
“सरकारचे अपयश लपविण्यासाठी  अनेक वक्तव्ये आणि ट्वीट केले गेले, परंतु हायकोर्टाच्या कारवाईत सर्व तथ्य समोर आले आहे. भाजपा सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे अनेक गोयंकरांना मृत्यूला सामोरे जावे लागले हा गुन्हा नव्हेत का? याची भाजप प्रदेशाध्यक्ष तनावडे जबाबदारी घेतील?” असा सवाल म्हांबरे यांनी उपस्थित केला.