भाजपने गोव्याचे ड्रग डेस्टिनेशन म्हणुन परिवर्तन केल्यानेच आज प्रत्येक ड्रग प्रकरणाचा सबंध गोव्याशी जोडला जात आहे : काँग्रेस

0
353
गोवा खबर : भाजपने गोव्याचे ड्रग डेस्टिनेशन म्हणुन परिवर्तन केल्यानेच आज प्रत्येक ड्रग प्रकरणाचा सबंध गोव्याशी जोडला जात आहे. भाजप-ड्रग माफिया सबंधाचे धागेदोरे तपासण्यासाठी माजी पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांच्या अकाली निधनाची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

गेल्या नोव्हेंबरात दिल्लीत गेले असताना, माजी पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांना ह्रदय विकाराचा तिव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले होते. ते एक कर्तबगार पोलीस अधिकारी होते व गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारांची चौकशी करीत होते. ते आरोग्याने तंदुरूस्त होते व एखादा मानसीक दबाव असल्याखेरीज त्याना ह्रदयविकाराचा झटका येणे अशक्यप्राय होते असा दावा  चोडणकर यांनी केला आहे.
स्व. प्रणब नंदा हे भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांचे समर्थन लाभलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडुन एका निष्पाप व्यापाऱ्याकडे ड्रग्स प्रकरणांत गोवण्याची धमकी देवुन, लाखो रुपये खंडणी मागण्याच्या प्रकरणाची चौकशी करीत होते व एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्याचा आदेश काढण्यापर्यंत  त्यांची चौकशी पुर्ण झाली होती.
नेमक्या याच कारणासाठी व सदर पोलीस अधिकारी निलंबीत झाल्यास आपल्या  पदाधिकारी व माजी आमदाराचे बिंग फुटणार या भयाने भाजपकडुन त्यांच्यावर चौकशी पुढे न नेण्याचा सारखा दबाव वाढत होता असे दावा चोडणकर यांनी केला आहे.
या एकंदर प्रकरणात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत वा एखाद्या भाजप मंत्र्यांचा ड्रग व्यवहारात गुंतलेले आपले नेते व पदाधिकारी यांना वाचवण्यासाठी स्व. प्रणब नंदा यांच्यावर दबाव होता का याची सखोल चौकशी होणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व त्यांचे मंत्रीमडळ सहकारी तसेच स्व. प्रणब नंदा यांचे टेलिफोन रॅकोर्ड तपासणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
सिने अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यु प्रकरणात आता ड्रग्स व्यवहाराचा सबंध लावला जात असल्याने, स्व. सुशांतचे मित्र तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर  चित्रपट निर्मीती केलेले संदिप सिंग यांची चौकशी होणे गरजेचे आहे. सदर संदिप सिंग व भाजप नेत्यांचे नेमके कसले सबंध होते हे जनतेला कळणे गरजेचे आहे,असे चोडणकर म्हणाले.
गोव्यात मंत्री मायकल लोबो हे अनेकदा ड्रग्स व्यवहारात असलेल्या लोकांची त्यांना माहिती असल्याचा दावा करतात. मंत्री मायकल लोबो तसेच सत्तरीत भाजप पदाधिकारी परब यांच्या फॅक्टरीत सापडलेले १०० किलो कॅटामायन ड्रग्स यांची चौकशी सरकारने केल्यास भाजपचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्स माफीया व व्यवहारात असलेले सबंध उघड होतील असे  चोडणकर यांनी म्हटले आहे.