भाजपने उत्पलचा वापर करून बाजूला फेकले:बाबुश

0
1232

गोवा खबर: लोकसभा निवडणूकीत पक्षाला फायदा व्हावा यासाठी भाजपने उत्पल पर्रिकर यांच्या नावाची पणजीचा उमेदवार म्हणून हवा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.काम होताच त्याला उमेदवारी नाकारुन बाजूला फेकण्यात आले असा आरोप काँग्रेसचे पणजीचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे.

पणजी मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रिकर यांना डावलून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली त्यावर प्रतिक्रिया विचारली असता मोन्सेरात म्हणाले,पणजीची उमेदवारी उत्पल पर्रिकर यांना मिळू शकली नाही याचे वाइट वाटते.अर्थात भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मात्र लोकसभा निवडणूकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपने उत्पल पर्रिकर यांच्या नावाची हवा केली.काम संपताच पणजीची उमेदवारी त्यांना नाकारण्यात आली.भाजपचे पहिल्या पासून हेच धोरण असून उत्पल पर्रिकर यांना त्याचा फटका बसला.

उत्पल पर्रिकर यांनी देखील राजकारणात येताना आपल्या वडिलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता.राजकारणात स्वच्छ माणसे यावीत असे भाईंना नेहमी वाटत असे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी वाटचाल करत आहे.माझ्याही मार्गात अडथळे येत असून त्यावर मात करत पुढे जाणार असल्याचे उत्पल यांनी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले होते.

उत्पल यांच्या मार्गात अडथळे कोण आणत आहे हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच दुःख बाजूला ठेवून भाजप नेत्यांची विनंती मानून उत्पल यांनी लोकसभेच्या प्रचरात स्वतःला झोकून दिले होते.म्हापसा येथील प्रचार सभेतील उत्पल यांचे भाषण चांगलेच व्हायरल झाले होते.त्यांनी गोव्यातील मतदारांकडे पाच कमळे मागितली होती.
उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक उमेदवारी अर्ज भरत असताना देखील उत्पल पर्रिकर आवर्जून उपस्थित होते.काल सिद्धार्थ कुंकळ्येकर उमेदवारी अर्ज भरताना उत्पल आपला भाऊ अभिजात सोबत उपस्थित होते.
मनोहर पर्रिकर यांचा वारसा चालवण्याची संधी उत्पल पर्रिकर यांना दिली जावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे.सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना पणजीची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर उत्पल पर्रिकर यांचे समर्थक नाराज झाले आहेत.ही नाराजी वाढली तर त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.