भाजपच्या राष्ट्रीय संघटन सचिवांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

0
1015
गोवा खबर:लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी गोव्यात येऊन पदाधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
 मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तब्बेत बिघडल्याने गोमेकॉत दाखल असून राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.नेमक्या त्याचवेळी संतोष गोव्यात आल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
संतोष गोव्यात दाखल झाल्या नंतर गोव्याचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या सोबत थेट गोमेकॉत गेले.तेथे त्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
त्यानंतर भाजप मुख्यालयात येऊन त्यांनी उत्तर गोव्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक तयारी आणि पक्षाच्या नियोजित उपक्रमांचा आढावा घेतला.यावेळी सोशल मीडिया विभागाचे प्रतिनिधी आणि पक्ष विस्तारक उपस्थित होते.
संतोष यांनी बैठकी आधी आणि नंतर देखील पत्रकारांशी बोलणे टाळले.
आजची बैठक फक्त संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी होती.पक्षाच्या उपक्रमांच्या आयोजनाचा आढावा संघटन सचिव संतोष यांनी घेतला.मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारपणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आजची बैठक नव्हती.ही बैठक पूर्वनियोजित होती,अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
बैठकीला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सरचिटणीस सदानंद तानावडे, दामू नाईक, सिद्धार्थ कुंकळ्येकर,किरण कांदोळकर,दत्तप्रसाद नाईक, दत्ता  खोलकर,सतीश धोंड, सभापती प्रमोद सावंत आदि उपस्थित होते.