भाजपच्या मतांचे विभाजन करून काँग्रेसच्या सर्वगुणसंपन्न उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वेलिंगकरांनी वावरावे हे खेदजनक: गडकरी

0
1024
 गोवा खबर:मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुभाष वेलिंगकर यांनी निवडणूक लढवणे यांसारखी दुसरी दुर्दैवी आणि दुख:द गोष्ट नाही, अशी खंत  व्यक्त करत वेलिंगकर यांचा आपण आदर करतो. ते स्वत: निवडून येऊ शकत नाहीत हे त्यांच्या पक्षाची मागील कामगिरी पाहून लक्षात येते. पण, भाजपच्या मतांचे विभाजन करून काँग्रेसच्या सर्वगुणसंपन्न उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वेलिंगकर यांनी वावरावे यासारखी खेदजनक बाब नाही,असे मत केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
गोव्यात सरकार चालवणं खूप कठीण ठरणार आहे. हे सरकार गेले तर गोव्याचे आणखी हाल होणार आहेत. सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना निवडून आणून या सरकारच्या स्थिरतेला बळकटी द्या आणि मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन गडकरी यांनी केले. 
पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंबंधी आयोजित भाजपच्या जाहीर सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी केंद्रीय आयूष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर, नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित होते.
गोवा राज्य हे जल आणि वायू प्रदूषणमुक्त झाले तर ती खऱ्या अर्थाने मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली ठरेल. हे तंत्रज्ञान देशात उपलब्ध असून राज्य सरकारने मनोहर पर्रीकर यांच्या नावे ही योजना राबवावी, असा सल्ला गडकरी यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिला. मनोहर पर्रीकर यांचे हृदय, मन आणि आत्मा हा गोव्याशी जुळला होता आणि त्यामुळेच सरंक्षणमंत्रिपदाचा त्याग करून ते गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यासाठी गोव्यात आले, असेही गडकरी म्हणाले.
काँग्रेस ही गुणग्राहक पार्टी ठरली आहे. त्यांनी पणजीकरांना ‘सर्वगुणसंपन्न’ उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार तसेच जमिनीवरचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला आहे. सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचे मत म्हणजे मनोहर पर्रीकर यांनी पणजी शहरासाठी पाहिलेल्या स्वप्नपूर्ततेसाठीचे मत असेल हे लक्षात ठेवूनच पणजीकरांनी मतदान करावे,असे आवाहन गडकरी यांनी केले.
आपल्याला मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न पुढे न्यायचे आहे. पणजी शहराला जागतिक स्मार्ट सिटीचे स्वरूप द्यायचे आहे. आपले प्रत्येक मत हे मनोहर पर्रीकरांनाच असेल आणि यावेळी दहा हजारांचा आकडा पार करून पर्रीकरांना एक अनोखी श्रद्धांजली पणजीकरांनी द्यावी, असे आवाहन सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले. आपल्याकडून काही चुका घडल्या असतील पण त्या जाणूनबुजून नव्हे तर अनवधानाने झाल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला माफ करा, असेही ते म्हणाले.
सध्या गाजत असलेल्या एका प्रकरणातील ‘ती’ चे काय झाले, हे २३ मे नंतर सर्वांना कळणार, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हाणला. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात प्रसिद्ध करावी लागली हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. तत्त्वाची भाषा करणारे लोक आपल्या कृतीतून कोणती तत्त्वे पाळतात हे लोकांना ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.