भाजपचे सरकार स्वयंकेंद्रीत : दिगंबर कामत

0
256
गोवा खबर: काॅंग्रेसच्या सरकारने नेहमीच लोकभावनांचा आदर केला व सामान्य माणसांच्या हितासाठी योजना राबवल्या. भाजपच्या स्वयंकेंद्रीत राजवटीचा चेहरा आता लोकांना कळला असुन, त्यामुळेच जनता आता परत एकदा काॅंग्रेसकडे आकृष्ट होत आहे व काॅंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत असा दावा काॅंग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी केला. 

काॅंग्रेस हाऊस मध्ये थिवी मतदारसंघातील कलाकार व सिने निर्माते उदय साळकर व त्यांच्या पाठिराख्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष विजय भिके, थिवी गट अध्यक्ष सतिश चोडणकर हजर होते.
काॅंग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना जनता भाजपच्या भ्रष्ट राजवटीला जनता कंटाळली असुन, यापुढे अनेक नागरीक काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
आज एक कलाकार काॅंग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे पाहुन मला आनंद झाला असे सांगुन, सिने निर्माता उदय साळकर यांचे पक्षात स्वागत करतो असे सांगुन, दिगंबर कामत यांनी गोव्यातील सिने निर्मात्यांसाठी काॅंग्रेस पक्षाने चित्रपट अर्थसहाय्य योजना चालीस लावली होती याची आठवण करुन दिली. भाजप सरकारने २०१२ नंतर सदर योजना अधांतरी ठेवली याचा कामत यांनी निषेध केला व स्थानीकांना मदत करणे सरकारचे कर्तव्य असते असे सांगीतले.
काॅंग्रेस सरकारच्या राजवटीत सेझ रद्द करणे, तज्ञ व लोकांचा सहभागाने तयार केलेला  प्रादेशीक आराखडा, माध्यम प्रश्न यावर नेहमीच जनता, पालक व विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊनच धोरण राबविले असे  कामत म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम जवळ जवळ ६७ टक्के पूर्ण झाले असतानाही सन २०१२ नंतर आठ वर्षे ते काम भाजप सरकारने रखडत ठेवले याचा उल्लेख करुन, आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता ते इस्पितळ कोविड रुग्णांसाठी उपयोगी ठरले असे कामत म्हणाले.
सामान्य गोमंतकीयांसाठी तयार केलेली गोंयचे दायज योजना, व्हिजन-२०३५ अहवाल भाजप सरकारने जाणुनबुजून अमलांत  आणला नाही व त्यामुळेच आजची परिस्थीती निर्माण झाल्याचा आरोप कामत यांनी केला.
काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेले उदय साळकर यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या कार्यकाळात कलाकारांसाठी अनेक योजना अंमलात आणल्याचे सांगीतले. काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी थिवी मतदारसंघातुन  काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.
दरम्यान,केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी पणजीत मशाल मोर्चा काढला.यावेळी कामत,चोडणकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.