भाजपचे संकल्प पत्र गोमंतकीयांसाठी आश्वासक: तेंडुलकर

0
795
गोवा खबर:भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या संकल्प पत्रात गोवा आणि गोमंतकीयांसाठी बरेच काही आहे.केंद्रात आणि गोव्यात भाजपची सत्ता असल्याने विकासाची फळे चाखणाऱ्या गोमंतकीय जनतेला आमचा जाहिरनामा आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.भाजपने आपल्या संकल्प पत्रात पर्यटन,किनारी विकास,छोट्या दुकानदारांचे हित असे अनेक मुद्दे घेतले असून मतदार आम्हाला यावेळी देखील निश्चित साथ देतील असा विश्वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला आहे.
 तेंडुलकर यांच्या मते,भाजप सरकारच्या काळात किनारी सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी किनारी सुरक्षा योजने अंतर्गत अत्याधुनिक साधने आणि निधी उपलब्ध करून किनारी पोलिस स्थानके सुरु करण्या बरोबरच समुद्री आणि किनारी  सुरक्षेसाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे.द्वीप सूचना प्रणाली तसेच राष्ट्रीय किनारी पोलिस अकादमीची स्थापना केल्या नंतर देशाची सागरी सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्ही पुढेही पावले उचलत राहणार आहोत
देशाच्या किनारी भागाचा विकास करून वाहतुकीची नवी व्यवस्था,पर्यटन आणि किनारी भागातील लोकांचा आर्थिक विकास साधण्यासाठी  आम्ही सागरमाला सारखा प्रकल्प हाती घेतला आहे.याशिवाय पुढच्या 5 वर्षात आम्ही आमच्या बंदरांची क्षमता दुप्पट करणार आहोत किनारी भागात किनारी शहरे, किनारी वाहतूक आणि किनारी औद्योगीकरणासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत,याकडे तेंडुलकर यांनी लक्ष वेधले आहे.
रस्ते आणि रेल्वे मार्गे होणारी माल वाहतूक जलमार्गे व्हावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने  प्रयत्न केले जाणार आहेत,असे तेंडुलकर संकल्प पत्राचा संदर्भ देत म्हणाले.
तेंडुलकर म्हणाले,आम्ही छोट्या आणि पारंपरिक मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 हजार कोटी रूपयांची तरतूद करून मत्स्य संपदा योजना सुरु करणार आहोत.ज्या अंतर्गत मच्छीमारांसाठी आइस बॉक्स,शीतगृहे, बर्फ निर्मिती प्रकल्प उभारण्या बरोबरच सागरी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी चांगली मार्केटिंग व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
आम्ही जलशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ पद्धतीने कर्जाची उपलब्धता करून देणार आहोत.मच्छीमारांच्या उत्पन्ना मध्ये भर पडावी यासाठी सागरी वनस्पती आणि मोत्यांची शेती तसेच सजावटीच्या माशांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे तेंडुलकर म्हणाले.
सेवा क्षेत्राअंतर्गत पर्यटनवर विशेष भर दिला जाणार आहे. सांस्कृतिक आणि प्राकृतिक महत्व असलेली ठिकाने निश्चित करून त्यांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास केला जाणार आहे. त्यासाठी अशी ठिकाणे दळण वळणाने जोडणे, प्राकृतिक ठीकाणाचे संरक्षण,हॉटेल, उपहारगृहे,मनोरंजनगृहे आदिंची उभरणी करून अशा ठीकाणाचे महत्व वाढवले जाईल.यासाठी स्वच्छ भारत सारखी योजना,भारतीय पुरातत्व विभाग,वन विभाग,स्थानिक प्रशासन,पर्यटन उद्योग यांना एकत्र आणून काम करण्यावर आमचा भर असणार आहे.भरतातील सर्व यूनेस्को मान्यताप्राप्त ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असणार आहोत,गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने गोव्याला याचा निश्चित फायदा होईल याची खात्री वाटते.
भारतीय अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी 22 क्षेत्राची निवड करून त्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार  असल्याचे सांगून तेंडुलकर म्हणाले,आंतरराष्ट्रीय बाजारात युवकांना  उपलब्ध असलेल्या संधीचा विचार करून उच्च क्षमता असलेल्या संरक्षण आणि फार्मस्यतिकल्स मध्ये रोजगार निर्मितीसाठि प्रयत्न केले जाणार आहेत.
गोव्याचे क्रीडाप्रेम जगजाहिर आहे,आम्ही राज्य आणि जिल्हा पातळीवरील क्रीडा कौशल्य हेरुन त्यांना अधिक बळकटी प्राप्त करून देणार आहोत.त्याशिवाय प्रादेशिक पारंपरिक क्रीडा प्रकारांचे जतन करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत.आमच्या सरकारने देशात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.खेलो इंडिया त्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.ग्रामीण भागातील क्रीडा प्रकार आणि खेळाडूंना चांगले मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून महिला आणि आदिवासी समाजात खेळाना प्रोत्साहित करण्याचे आम्ही ठरवले आहे.गोव्याला याचा फायदा होणार आहे,याकडे तेंडुलकर यांनी लक्ष वेधले.
छोट्या दुकानदारांसाठी आम्ही पेन्शन योजना सुरु करणार आहोत,असे सांगून तेंडुलकर म्हणाले,
छोट्या दुकानदारांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु करणार आहोत.गोव्यातील हजारो छोट्या दुकानदारांना त्यामुळे अच्छे दिन अनुभवता येणार आहेत.