भाजपचे अपराध्यांना संरक्षण :काँग्रेस

0
854
गोवा खबर: तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे जन्मगाव म्हापसा शहरात १८ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या एका सोनाराच्या खुनाचा तपास करण्यास व खुन्याला शोधुन काढण्यास आजपर्यंत गोवा पोलिसांना आलेले अपयश हे एकमेव उदाहरण सन २०१२ मध्ये गोव्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला असल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे सरकारच्या नाकर्तेपणावर तसेच लोकांच्या सुरक्षा व आरोग्या विषयी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना टिका संबोधुन टाळण्याचा प्रयत्न करतात हे दुर्देवी आहे, अशी टिका काॅंग्रेसचे प्रवक्ते ट्राजन डिमेलो यांनी केली आहे. 
गोव्यात भाजप सरकार ड्रग्स माफिया, भिकारी माफिया व मर्डर माफिया यांना संरक्षण देत असल्याचा आम्ही पुर्नउच्चार करतो व गोव्याला गुन्हेगारांचे स्थळ बनविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप  डिमेलो यांनी केला.
मडगावात सोनाराचा खुन झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेणारे व दिशाभूल करणारी विधाने करुन तपासात अडथळा आणणारे भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटनमंत्री सतिश धोंड यांच्या मनात काळेबेरे होते हे स्पष्ट आहे,असा दावा डिमेलो यांनी केला आहे.
डिमेलो म्हणाले,भाजप सरकारने खुनाचा तपास योग्य दिशेने करण्यास नाकामी ठरलेल्या मडगाव पोलिस निरीक्षकावर अद्याप का कारवाई केली नाही? दक्षिण गोव्याच्या  पोलिस उप-अधिक्षकाची अजुनही का नेमणुक केली नाही या प्रश्नाची उत्तरे भाजपवाल्यानी देण्याची हिम्मत दाखवावी.
भाजप सरकारच्या कारकिर्दीत भाजप पदाधिकाऱ्याच्या फॅक्टरीत सापडलेल्या कॅटामाइन ड्रग्स साठ्याची चौकशीचे काय झाले?  लोकायुक्तांनी पकडलेल्या व चौकशी करण्याचे आदेश दिलेल्या माजी भाजप मुख्यमंत्र्यांच्या भावाचा सहभाग असलेल्या बिच क्लिनींग कंत्राट घोटाळ्याची चौकशी का केली नाही? लोकायुक्तांनीच घोटाळा असल्याचे सांगीतलेल्या सायबरअेज योजना घोटाळ्याची चौकशी का झाली नाही? माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांच्या मेहुण्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते त्यावर पुढे काय कारवाई झाली? सरकारी नोकर असलेले डाॅ. श्रीकांत आजगावकर व रश्मी आजगावकर यांच्या विदेश दौऱ्यांच्या खर्चाची का चौकशी झाली नाही? जिएफडीसीचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत आजगावकर यांचा फुचबाॅल मॅच फिक्सींग मध्ये सहभाग असल्याचा संशय असुनही त्यांना त्या पदावरुन का काढले नाही? पाटो स्पेसिस इमारतीला कोट्यावधी रुपये भाडे देण्यावर भाजप का बोलत नाही? असे विवीध प्रश्न विचारुन  डिमेलो यांनी भाजप अध्यक्ष तानावडे यांच्याकडे उत्तर देण्याची मागणी केली आहे.
आज गोव्यातील भाजप सरकार केवळ लुटमार करण्यात व्यस्त असुन, कोविड लाॅकडाऊन काळात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी कोळसा व खनीज वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्याने आज गोव्यात कोविडचे संकट महाभयंकर झाले आहे,असा आरोप डिमेलो यांनी केला.
तिरुमला तिरुपती बॅंकेचे संचालक कपिल झवेरी याच्याशी भाजपचे सदस्य प्रकाश वेळीप यांचे संबंध असल्याचे उघड झाल्या नंतरही सदर प्रकाश वेळीप यांना बडतर्फ करण्याचे धैर्य भाजपला नाही. प्रकाश वेळीप याला बडतर्फ केल्यास भाजपच्या बड्या धेंडांची लक्तरे वेशीवर टांगली जातील अशी भिती असल्यानेच भाजप आज गप्प आहे,असा आरोप करून डिमेलो म्हणाले,गोव्यातील जनता भाजपची कर्मे उघड्या डोळ्यानी बघत आहे. योग्य वेळी धडा शिकवायला लोक तयार आहेत हे सदानंद तानावडे व सतिश धोंड यानी लक्षात ठेवावे.