भाजपची अवस्था डोके नसलेल्या कोंबड्यासारखी :आप 

0
238
गोवा खबर: भाजप सरकारची तुलना अवस्था डोके नसलेल्या कोंबड्या सारखी झाली आहे. कुठलीही दिशा नसताना ते कुठेही इकडे तिकडे धावत सुटले आहे. आधी सनबर्न महोत्सवाला मान्यता देण्यात आली आणि आता तो रद्द करण्यात आला आहे याच्यावरून सरकार दरबारी कसा गोंधळ सुरू आहे हे दिसून येते, अशी टिका आम आदमी पक्षाचे प्रवक्ता सुरेल तिळवे यांनी केली आहे. 
 तिळवे यांनी भाजप सरकारवर टीका करताना सरकारच्या प्रशासकीय गोंधळाचा खरपूस समाचार घेतला. भाजप सरकार लोकांशी कुठल्याही विषयावर चर्चा, वार्तालाप किंवा विचार विनिमय करायला तयार नाही ज्यामुळे आता त्याना शेवटच्या मोक्याच्या क्षणी सनबर्न महोत्सव रद्द करणे भाग पडले असल्याचा आरोप तिळवे यांनी केला.
 तिळवे म्हणाले, यावेळी होऊ घातलेल्या सनबर्नमुळे कोविड विषाणूच्या बॉम्बचा विस्फोट करणारा ठरू शकला.या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने लोक हजेरी लावणार होते.
 दरवर्षी सरकार स्वतःचे डावपेच खेळते आणि महोत्सवाला देण्यात येणारी परवानगी शेवटच्या क्षणापर्यंत अधांतरी लटकून ठेवते कारण त्यांना त्यातून मिळणाऱ्या कमिशनचा वाटा जास्त वाढवायचा असतो,असा आरोप करून तिळवे म्हणाले,
ही एक खेदपूर्ण आश्चर्याची गोष्ट आहे की कोविड रुग्णांसाठी खाटाची व्यवस्था दिवसेंदिवस कमी पडत असताना सरकार सनबर्न महोत्सवासाठी परवानगी देते, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतील आणि अर्थातच सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला पायदळी तुडवले जाणारच, हे ओघाने आलेच .
 मुख्यमंत्र्यांचा आपल्या इतर मंत्र्यांवर काहीही ताबा राहिलेला नाही,असा  आरोप करून तिळवे म्हणाले,  सनबर्न संदर्भात आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली नाही. महामारीचे संकट अजूनही कमी झाले नाही.यावरून सगळा सावळा गोंधळ स्पष्ट दिसतो.
तिळवे म्हणाले, एरव्हीही सरकार स्थानिक लोकांशी वा जनतेशी कुठल्याही विषयावर चर्चा न करता काहीही करीत सुटले आहे मग रेल्वे मार्गांचे डबल ट्रेकिंग असो, महामार्ग रुंदीकरण असो आणि औद्योगिक प्रकल्पांसाठी आरक्षित जंगले नष्ट करणे असो, हे सर्व लोकांच्या विरुद्ध असलेले प्रकल्प सरकार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.  सरकारने सनबर्न महोत्सव जनतेच्या दबावामुळे रद्द केला आहे.
 गोव्याच्या जनतेशी यापुढे कुठल्याही विषयावर चर्चा व सल्ला मसलत करूनच निर्णय घेतला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे तिळवे शेवटी म्हणाले.