भांडवलदारानाच पाठिंबा देण्याचे भाजपचे धोरण परत एकदा उघड : अमरनाथ पणजीकर

0
516
गोवा खबर:केवळ भांडवलदार व बडे उद्योगपती यांनाच सर्व सुविधा देणे व गोरगरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हे भाजपचे “क्रोनी कॅपिटालीजम” चे धोरण भाजपचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यानी काल गोव्याची अर्थव्यवस्था पुनर्रजीवीत करण्यासाठी नेमलेल्या समितीवरील सदस्यांची नावे वाचुन उघड झाले आहे,असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
सरकारने काल जाहिर केलेल्या समितीत बडे उद्योगपती व उद्योजक यांचीच नावे असुन, यातील बहुतेक जणांचा आपल्या उद्योग-व्यवसायासाठी सरकारकडुन आर्थिक फायदा मिळवीण्याचा प्रयत्न असेल,असा आरोप करून पणजीकर म्हणाले, स्वतःचे हितसंबंध गुंतलेले असताना ते इतरांचा विचार कसा काय करतील हे कळणे कठिण आहे.

पणजीकर म्हणाले,सदर समितीवर लहान व्यावसायीक, गाडे व्यापारी, बेकरीवाले, मोटरसायकल पायलट व रिक्शा असोसिएशन, कामगार संघटना, बार व तावेर्न, केश कर्तनालय अशा लहान व्यावसायीकांच्या प्रतिनीधीना स्थान देण्यात आलेले नाही. आज खरी म्हणजे या लोकानांच सर्वाधिक आर्थिक झळ बसलेली असुन, असंवेदनशिल सरकारला मात्र त्याचे पडलेले नाही.
भाजपचे केंद्र व राज्यातील सरकारे नेहमीच मोठे उद्योगपती व व्यावसायीक यांचीच भलावण करीत आली असुन त्यांची करोडो रुपयांची कर्जे माफ करताना मोदी सरकारने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे,असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.
गोव्यातील भाजप सरकार मोदींचाच कित्ता गिरवत आहे,असे सांगून पणजीकर म्हणाले, लाॅकडावनच्या पहिल्या आठवड्यात लहान बाळ, वयोवृद्ध यांना दूध व पावा पासुन वंचित ठेवुन भाजपचे मंत्री आमदार व पदाधिकारी हे जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करण्यात गुंतले होते हे जनता विसरलेली नाही.
केवळ २०२२ च्या निवडणुकांसाठी मतदार माहिती मिळवीण्याचा छुपा अजेंडा घेऊन, कोणतेही सुरक्षा कवच न देता अंगणवाडी सेविका, शिक्षक व इतर कर्मचाऱ्याना सरकारने आज सामाजिक सर्वेक्षणाच्या नावाखाली कोरोना विषाणूच्या विळख्यात ढकलले आहे,असा आरोप देखील पणजीकर यांनी केला आहे. यात काही बरे-वाईट झाल्यास गोमंतकीय जनता या सरकारला कदापी माफ करणार नाही,असा इशारा पणजीकर यांनी दिला आहे.