भव्य निसर्गोपचार शिबिराचे आयोजन

0
804
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, महाराष्ट्र-गोवा चे महासंचालक श्री आर.एन. मिश्रा गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या निसर्गोपचार शिबिराविषयी पणजी येथे 25 सप्टेंबर 2019 रोजी पत्रकारपरिषदेला संबोधित करताना. एनआयएनच्या संचालक डॉ के सत्य लक्ष्मी, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक अर्मेलिंदा डायस, आरओबीचे सह संचालक संतोष अजमेरा यांची याप्रसंगी उपस्थिती.

 गोवा खबर:केंद्रीय आयुष मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्या वतीने भव्य निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019 दरम्यान कला अकादमी येथे शिबिर आयोजीत करण्यात येईल. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेकडून वर्षभरात दीडशे शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे, त्यातील हे पहिले शिबीर आहे.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे महासंचालक आर.एन.मिश्रा यांनी आज पणजी येथे पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी डॉ के सत्य लक्ष्मी संचालक निसर्गोपचार संस्था, अर्मेलिंदा डायस, अतिरिक्त महासंचालक, पत्र सूचना कार्यालय-पणजी, संतोष अजमेरा, सह संचालक, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांची उपस्थिती होते.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वास्थ अवलंबन से स्वावलंबन’ प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो  निर्मित प्रदर्शनात महात्मा गांधी यांचा इतिहास, त्यांची शिकवण, नैसर्गिक उपचारासंबंधी त्यांचा आग्रह यासंबंधी प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

सोमवार, 30 सप्टेंबर रोजी राज्यपाल श्रीमती मृदूला सिन्हा यांच्या हस्ते निसर्गोपचार शिबिराचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आयुष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पी.के.पाठक यांची उपस्थिती असणार आहे. १ ऑक्टोबर रोजी पणजी शहरात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तर, 2 ऑक्टोबर रोजी समारोपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांची उपस्थिती असणार आहे.

निसर्गोपचार शिबिराला दहा हजारांहून अधिक लोक भेट देण्याची शक्यता आहे. शिबिरात निसर्गोपचार उपचाराशी संबंधित संस्था, विद्यार्थी, डॉक्टर्स, निसर्गोपचाराशी संबंधित तज्ज्ञ, गांधीवादी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, खादी, सेंद्रीय पद्धतीने शेती करणारे शेतकरी यांचा या शिबिरात सहभाग असणार आहे.

महात्मा गांधींनी सांगितलेल्या आरोग्यविषयक विचारांचा प्रसार, मोफत निसर्गोपचार, गांधी आणि आरोग्य विषयावर विद्यार्थांसाठी निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्याविषयी मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम असे या शिबिराचे स्वरुप असणार आहे.