‘ब्लू व्हेल’च्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक

0
925

जगभरातील अनेक तरुण मुलांना थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणाऱ्या ‘ब्लू व्हेल’ या गेमच्या ग्लोबल मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या विनाशकारी खेळाचा सापळा रचून तरुणाईच्या जिवाशी खेळणारी व्यक्ती ही १७ वर्षीय तरुणी आहे. अनेक तरुणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या रशियन तरुणीवर ठेवण्यात आलाय.याआधी मॉस्को शहरातील एका व्यक्तीला, तरुणींना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

‘ब्लू व्हेल’ खेळणाऱ्यांना एका ग्रूपचं सदस्य व्हावं लागतं. ही रशियन तरुणी त्या ग्रूपची अॅडमिन होती. जी मुलं या सापळ्यात अडकायची त्यांना ती धमकावत असे. आपल्या सूचना न ऐकल्यास, टास्क पूर्ण न केल्यास आई-वडिलांना, बहीण-भावाला ठार मारण्याची धमकी ती द्यायची, अशी माहिती रशियन तपास पथकाने दिली.  या तरुणीची ओळख उघड केलेली नाही. जाळ्यात आलेल्या मुलांना ही तरुणी ५० टास्क द्यायची. त्यातून त्यांची शारीरिक आणि मानसिक छळवणूक करायची आणि अखेर त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडायची. ही विकृती नेमकी कुठून आली आणि त्यातून तिला काय आनंद मिळायचा, हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.