ब्रिटिश युवती स्कार्लेट खुन प्रकरणी सॅमसन दोषी;कार्वालो निर्दोष 

0
812
 गोवा खबर: ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग बलात्कार व खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरोपी सॅमसन डिसोझा याला दोषी ठरवले आहे. त्याच्यावरील सदोष मनुष्य वध आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला आहे.  दुसरा आरोपी प्लासिदो कार्वालो याला मात्र निर्दोष ठरवण्यात आले आहे. सॅमसनला शुक्रवारी १९ रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. 
१५ वर्षीय ब्रिटीश युवती स्कार्लेटला ड्रग्स पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचर करण्यात आले होते.एवढेच नव्हे तर  हणजुणे किनाऱ्यावर तिला मरणासन्न अवस्थेत सोडून देण्याचा आरोप दोघांवरही ठेवण्यात आला होता. हे आरोप सॅम्सनच्या बाबतीत सिद्ध झाल्याने त्याला सदोष मनुष्यवधासाठी  दोषी ठरवण्यात आले आहे. प्लासिदोला मात्र त्यातून मुक्त करण्यात आले. न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांनी हा निवाडा मुंबईहून व्हिडिओ कॉन्स्फरन्सींगच्या माध्यमातून दिला. न्या. धनुका यांच्यासमोर गोव्यात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. परंतु धनुका यांची नंतर मुंबईत बदली झाली होती.  दोषी ठरवण्यात आलेल्या सॅमसनला कोणती  शिक्षा दिली जाते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
२३ सप्टेंबर २०१६ रोजी पणजी बाल न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष घोषित करणारा  निवाडा खंडपीठाने एका आरोपीच्या बाबतीत फिरवला आहे. बाल न्यायालयाच्या निवाड्याला सीबीआयकडून खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. खंडपीठात चाललेल्या सुनावणीत सीबीआयतर्फे अ‍ॅड. इजाझ खान यांनी जोरदार युक्तिवाद केले होते. बाल न्यायालयाने या प्रकरणातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत असा युक्तिवाद त्यांचा होता. सादर करण्यात आलेले पुरावे गांभीर्याने घेतले नाहीत असा आदेश देण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार नाही हा एकमेव मुद्दा विचारात घेऊन संशयितांना निर्दोष घोषित करण्यात आले होते असा दावाही त्यांनी केला होता.
या निवाड्यात पुराव्यांच्या अभावामुळे संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. साक्षीदारांच्या साक्षी न झाल्यामुळे हे प्रकरण कमजोर झाले होते. परंतु खंडपीठाने केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा एकमेव मुद्दा लक्षात न घेता सीबीआयकडून  सादर करण्यात आलेले इतर पुरावेही गांभीर्याने घेतले. स्कार्लेटला देण्यात आलेले एलएसडी ड्रग्स, शवविच्छेदन अहवालात त्याला मिळालेली पुष्टी व इतर परिस्थितीजन्य पुरावेही खंडपीठाने गांभिर्याने घेतले.
खंडपीठात आव्हान दिल्यानंतर अंतिम सुनावणी १० एप्रिल रोजी  सुरू झाली होती. बाल न्यायालयात चुकीच्या मुद्यांवर आधारीत आरोपी सॅमसन डिसोझा आणि प्लासिदो कार्वालो यांना निर्दोष सोडण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून खंडपीठात आव्हान देताना वेगळ्या मुद्यांवर हे प्रकरण लढवण्याचा पवित्रा घेतला होता. स्कार्लेट किलींगचा मृतदेह १८ फेब्रुवारी २००८ रोजी हणजुणे किनाऱ्यावर अर्धनग्न स्थितीत आढळून आला होता.