ब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणी तामीळनाडूच्या एकास अटक

0
1629
गोवा खबर : पाळोळे येथे ब्रिटिश महिलेवर बलात्कार करून तिच्याकडील मौल्यवान सामान चोरुन नेल्याप्रकरणी रामचंद्र चंद्रालप्पा (३०, तामिळनाडू) याला  पोलिसांनी गुरुवारी पहाटे मडगाव येथून ताब्यात घेतले.
मोरजी येथील हॉटेलमध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून  संशयित रामचंद्र चंद्रालप्पा (३०, तामिळनाडू) हा पळाला होता. चौकशीवेळी रामचंद्र यानेच मोरजी येथील हॉटेल सुर्लामारमध्ये उतरलेल्या मुंबईतील दाम्पत्याचा सुमारे ३२ लाखांचा ऐवज लंपास केल्याचे तसेच ब्रिटिश महिलेवर पाळोळे येथे झालेल्या बलात्कार प्रकरणात त्याचाच सहभाग असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी मोरजी चोरी प्रकरणातील त्याचा साथीदार प्रकाश एन. ए. (३५, आंध्र प्रदेश) याला बुधवारी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रामचंद्र चंद्रालप्पा व त्याचा साथीदार प्रकाश एन. ए. यांनी ६ डिसेंबर रोजी मोरजी येथील एका हॉटेलमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हॉटेल कर्मचारी व स्थानिकांनी त्या दोघांनाही पकडून पेडणे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पण दोघाही चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. याप्रकरणी पोलिस खात्याने अल्ताफ नाईक, रामचंद्र वस्त व जीप चालक विन्सी डायस या तिघा पोलिसांना सेवेतून निलंबित केले होते.
या चोरीनंतर याच संशयितांनी १८ डिसेंबर रोजी हनिमूनसाठी मुंबईतून गोव्यात आलेल्या आणि मोरजी येथील सुर्लामार हॉटेलमध्ये उतरलेल्या नवदाम्पत्याच्या खोलीत घुसून सुमारे ३२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर पेडणे पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली व रामचंद्र याचा साथीदार प्रकाश एन. ए. याला १९ रोजी रात्री ११ वाजता ग्रीनव्हीव हॉटेलमधून ताब्यात घेतले. संशयित प्रकाशच्या मदतीने पोलिसांनी रामचंद्र याचा शोध घेण्यास सुरुवात केली व संशयित रामचंद्र याला गुरुवारी पहाटे मडगाव येथील हॉटेलमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.
दरम्यान, रामचंद्र याची चौकशी करत असताना पोलिसांना त्याच्याकडे ब्रिटिश महिलेचे नाव असलेले एटीएम कार्ड सापडले. त्यानंतरच्या चौकशी दरम्यान रामचंद्र याच्याकडे ज्या महिलेचे एटीएम होते, तिच्यावर बुधवारी रात्री पाळोळे येथे बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.  रामचंद्र हा चोरीच्या दुचाकीद्वारे काणकोण गेला होता. बुधवारी रात्री पाळोळे येथे ब्रिटिश महिलेवर बलात्कार करून तो मडगावला आला. पहाटे ५.३० वाजता तो मडगावात पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.  दोघाही संशयितांना पेडणे पोलिस स्थानकात आणून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक सागर धाडकर, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, कॉन्स्टेबल शैलेश पार्सेकर, राजेश येशी, प्रसाद तुयेकर, अनंत भाईडकर, मिथिल परब व रुपेश कोरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पेडणे व काणकोण पोलिस करीत आहेत.
संशयितांकडे सापडले विदेशी चलन 
पोलिसांना अटक केलेल्या प्रकाश एन. ए. याच्याकडे तीन हजार रुपयांच्या भारतीय जुन्या नोटा, दहा हाँगकाँग डॉलर, दहा दिनार तसेच रामचंद्र याच्याकडे एक कॅनन कॅमेरा, वीस पाऊंड्स, वाहन चालविण्याचा परवाना, आयफोन चार्जर तसेच पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या.
पेडणे पोलिसांनी गुरुवारी दोन्ही संशयितांवर चोरीप्रकरणी गुन्हा नोंद केला व रात्री उशीरा संशयित रामचंद्र याला काणकोण पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई व उपनिरीक्षक धीरज देविदास यांच्याकडे बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी सुपूर्द केले.